गोंदिया : संसदेने नारी शक्ती वंदन विधेयक पारित केले असून यामुळे येत्या काळात संसदेसह राज्यांच्या विधिमंडळांमध्ये महिलांचा मोठा सहभाग दिसून येणार आहे. नारी शक्तीच्या सहाय्यानेच देशाच्या अमृत काळात विकसित भारताची वाटचाल अधिक मजबुतीने होईल, असा विश्वास उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोंदियातील धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या परिसरात स्व. मनोहरभाई पटेल यांच्या ११८ व्या जयंतीनिमित्त सुवर्ण पदक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपराष्ट्रपती धनखड बोलत होते. व्यासपीठावर उपराष्ट्रपती यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनील मेंढे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार डॉ. सी. रमेश, आमदार विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, राजू कारेमोरे, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष वर्षा पटेल, आदी उपस्थित होते.

हेही वाचा : खळबळजनक! शाळेच्या छतावर मृत अर्भक, मांसाचे तुकडे आढळले

उपराष्ट्रपती पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या अमृत काळात २०४७ पर्यंत सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट ठेवले आहे. या विकासात महिलांचे मोलाचे योगदान राहणार आहे. दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात कर्तव्यपथावर झालेल्या विविध संचलनात महिलांनी केलेल्या नेतृत्वामुळे देश व जगास नारी शक्तीचे दर्शन झाले. संसदेच्या नव्या वास्तूत केंद्र शासनाने ‘नारी शक्ती वंदन’ विधेयक पारित करून राजकीय क्षेत्रात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. यामुळे येत्या काळात संसदेत व विविध राज्यांच्या विधिमंडळात महिलांचा सहभाग वाढेल व विकसित भारताच्या वाटचालीत त्यांची महत्त्वाची भूमिका ठरेल. गेल्या दशकात भारताने वेगाने आर्थिक प्रगती साधत जगातील पाचवी अर्थव्यवस्था म्हणून स्थान मिळविले आहे. या प्रगतीतही महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. जर्मनी व जपानला मागे टाकत भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वासही उपराष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा : फडणवीस म्हणाले, “गारपीटग्रस्तांना मदत करू”

गोंदिया जिल्ह्यात मनोहरभाई पटेल यांनी शाळा, महाविद्यालये स्थापन करून जणू शिक्षणाची गंगाच प्रवाहित केली आहे. मनोहरभाई पटेल यांनी निर्माण केलेला आदर्श कार्याचा वसा गोंदिया शिक्षण संस्थेने निष्ठा व प्रामाणिकपणे जपल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तत्पूर्वी, खासदार प्रफुल पटेल यांनी प्रास्ताविकात गोंदिया-भंडारा भागात मनोहरभाई पटेल यांनी निर्माण केलेले शिक्षणाचे जाळे तसेच कृषी, सिंचन, राजकारण, आदी क्षेत्रात त्या काळात संघर्षातून दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. यावेळी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी, गुणवंत विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, क्रीडापटू आणि पत्रकारांना गौरविण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In gondia vice president jagdeep dhankhar on nari shakti vandan adhiniyam and development of india sar 75 css
First published on: 11-02-2024 at 18:35 IST