नागपूर : चिंचभवन रेल्वे उड्डाणपुलावरून जाणाऱ्या सुसाट वाहनांमुळे होणारे अपघात वाढल्याने चिंचभवन चौकाला अपघातप्रवण स्थळ घोषित करण्यात आले. चिंचभवन चौकात असलेल्या महामार्गावरील ‘क्रॉसिंग’वर सुसाट वाहने आणि वस्तीतून येणाऱ्या वाहनांची गर्दी होत असल्यामुळे वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपुरातून वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि उत्तर प्रदेशकडे जाण्यासाठी मुख्य रस्ता म्हणून चिंचभवन उड्डाण पुलाचा वापर केला जातो. शहरातून बाहेर जाण्यासाठी सुलभ मार्ग असल्यामुळे या मार्गावर वाहनांची मोठी गर्दी असते. त्यासाठी चिंचभवन रेल्वे उड्डाणपुलावरून वाहतूक चिंचभवन चौकानंतर खापरीकडे जाते. मात्र, चिंचभवन रेल्वे उड्डाणपुलावरून वाहने भरधाव जात असल्याने चिंचभवन चौकात अडकतात. शहरात जाण्यासाठी चिंचभवन चौकातूनच वाहनांना जावे लागते. मात्र, तेथे दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या बघता नेहमी वाहतूक कोंडी निर्माण होते. तसेच चिंचभवन वस्तीतून येणाऱ्या वाहनांना हाच चौक पार करावा लागतो. या सर्व प्रकारामुळे चिंचभवन चौकात चोवीस तास वाहतूक कोंडी निर्माण होते. तासनतास कोंडी फुटत नाही. त्यामुळे नागपूरकरच नव्हे तर अन्य शहरातील जड वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. या पुलाच्या दोन्ही बाजूंना दोन रस्ते तयार करण्यात आले आहेत. परंतु, त्या रस्त्यावर विरुद्ध दिशेने धावणारीच वाहने सर्वाधिक आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका पुलासह या रस्त्यामुळे कायम आहे. जुन्या उड्डाणपुलावरील पथदिवे बंदावस्थेत आहेत. तसेच रस्त्याचेही सिमेंटीकरण व्यवस्थित करण्यात आले नाही, त्यामुळेही अपघाताचा धोका वाढला आहे.

हेही वाचा : पश्चिम विदर्भात टँकर फेऱ्यांमध्ये वाढ; कोट्यवधींचा खर्च, मात्र…

आतापर्यंत चौकात ७ अपघातात पाच ठार

नागपूर आरटीओकडून चिंचभवन चौकाला अपघातप्रवण स्थळ घोषित करण्यात आले आहे. या चौकात २०१९ ते २०२३ या कालावधीत ७ अपघात झाले असून त्यापैकी ५ जणांचा मृत्यू तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. या चौकात महामार्गाला ‘क्रॉसिंग’ बनवण्यात आले. या चौकातून वस्तीतील वाहने उड्डाणपुलावर आणि रस्त्याच्या पलीकडील वाहनांना वस्तीत जाण्याचा पर्याय आहे. चौकात ‘क्रॉसिंग’ असल्यामुळेच वाहतूक कोंडी निर्माण होते.

चौकाला खाद्यपदार्थाच्या हातठेल्यांचा विळखा

चिंचभवन चौकाला खाद्यपदार्थाच्या हातठेल्यांनी विळखा घातला आहे. खाद्यपदार्थाचे ठेले अगदी रस्त्याच्या कडेला असल्यामुळे ग्राहक रस्त्यावर वाहने उभी करून नाष्टा करतात. तसेच काही भाजीपाला विक्रेत्यांनीही रस्त्याच्या कडेला ठाण मांडले आहे. अतिक्रमण विभागाने कारवाई केल्यास रस्ता मोकळा होऊन अपघाताचाही धोका टळेल.

हेही वाचा : यवतमाळात तोतया पोलिसांसह खऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ; वृद्धास लुटले, नेरमध्ये चार घरफोड्या

सिग्नलमुळे निर्माण झाला संभ्रम

उड्डाण पुलावरून खाली उतरताच चिंचभवन चौकातील वाहतूक सिग्नलमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. वाहतूक सिग्नल सुरू असल्यास सिग्नलवर थांबणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असल्याने वाहनांच्या थेट पुलापर्यंत रांगा लागतात. तर सिग्नल बंद ठेवल्यास वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पुन्हा एका अपघातात युवक ठार

चिंचभवन चौक परिसरात शनिवारी झालेल्या अपघातात एक युवक ठार झाला. अनिल लक्ष्मीकांत निनावे (३४, खैरीगाव) असे मृत युवकाचे नाव आहे. तो मिनी ट्रकमध्ये विटा भरण्याचे काम करीत होता. शनिवारी दुपारी ट्रकचालक अमित रंगारी यांच्यासोबत ट्रकमध्ये बसून तो विटाभट्टीकडे जात असताना चिंचभवन चौक ते भवन शाळेकडे जाणाऱ्या मार्गावर ट्रक उलटला. या अपघातात अनिल निनावे गंभीर जखमी झाला. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हेही वाचा : अकोला : वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे अपघातांचे वाढते संकट, तीन महिन्यात ५२ बळी

रेल्वे उड्डाणपुलावरून सुसाट धावणारी वाहने थेट चिंचभवन चौकात थांबतात. या चौकातून जीव मुठीत धरून वाहन काढावे लागते. वाहतूक कोंडीमुळे रस्ता ओलांडतानाही अपघाताचा धोका कायम असतो.

सोनू भोयर, विद्यार्थिनी

चिंचभवन चौकात वाहतूक सिग्नल कार्यरत आहेत. तसेच चौकात पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी आणि तीन कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलीस तत्पर आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुद्धा चालान कारवाई केली जाते.

रितेश अहेर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा.
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur chinchbhavan railway flyover is becoming an accident prone place due to speeding vehicles adk 83 css