नागपूर : मेट्रोरेल्वे, विवेकानंद स्मारक आणि क्रेझी केसल हे अंबाझरी तलाव आणि लगतच्या वस्त्यांसाठी धोकादायक असल्याचे तांत्रिक अभ्यास अहवालातून आणि सप्टेंबर २०२३ च्या भयंकर पूरस्थितीतूनही स्पष्ट झाले आहे. तरीही सुरक्षा उपाययोजना करण्यात प्रशासकीय यंत्रणांची चालढकलच सुरू आहे.

अंबाझरी तलाव १५० वर्षे जुना असून हेरिटेज श्रेणी ‘अ’ मध्ये त्याचा समावेश आहे. या तलावाचे संवर्धन आणि जतन करणे अपेक्षित असून त्याचे निकषही निश्चित आहेत. मात्र, विकासाच्या नावावर राज्यकर्ते आणि प्रशासन या तलावाच्या मूळावरच उठल्याचे दिसून येते. प्रशासकीय यंत्रणेचा ढिम्मपणाचा फटका तलावालगतच्या नागरी वस्त्यांना गतवर्षीच्या पूरस्थितीमुळे बसला. हे प्रकरण न्यायालयात गेल्यावरही पावसाळ्यापूर्वी तलाव आणि लोकवस्त्यांमधील नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने काही ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत. केवळ पारंपरिक उपाययोजनेवरच यंत्रणांचा भर दिसत आहे. मागील काही महिन्यांपासून तलावाजवळ नागनदी पात्र रुंदीकरण, पुलाचे पुनर्निर्माण व तत्सम कामे करणार असेच वारंवार सांगितले जात असले तरी कॉर्पोरेशन कॉलनी, गांधीनगर स्केटिंग रिंगचे बांधकाम तोडण्यापलीकडे पुढे काहीच झालेले नाही.

हेही वाचा : पोलीस भरतीसाठी अभियंते, डॉक्टरांसह उच्चशिक्षितांचेही अर्ज

अंबाझरी तलावाच्या पायथ्याशी मेट्रो रेल्वेसाठी १४ स्तंभ व तलावालगतच मेट्रो स्थानक उभारण्यात आले. हे करताना तलावाच्या बांधापासून सुमारे २०० मीटर परिसरात बांधकाम न करण्याचे निकष डावलण्यात आले. यामुळे जवळच्या लोकवस्तीला देखील धोका आहे, असे निरीक्षण धरण सुरक्षा संस्थेने (डीएसओ) आपल्या अहवालात नोंदवले. यानंतर उच्च न्यायालयाने तलावाचे बळकटीकरण करण्याचे आदेश २२ मार्च २०१८ रोजी दिले. त्यावर अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. विवेकानंद स्मारकाच्या सौंदर्यीकरणासाठी प्रवाहात अडथळा निर्माण करण्यात आला. अडीच एकरमधील हे स्मारक अगदी तलावाला लागून आहे. तलावाच्या ‘ओव्हर फ्लो पॉईन्ट’वर ५१ फूट उंच विवेकानंद स्मारक आहे. ते तलावाच्या बांधाला इजा पोहोचवणारे आहे, असे डीएसओने अहवालात नमूद केले आहे. सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तलावाशेजारील लोकवस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरून कोट्यवधीचे नुकसान झाले. विवेकानंद स्मारक आणि क्रेझी केसल यामुळे ही पूरस्थिती निर्माण झाल्याची बाब समोर आली. स्मारकामुळे विसर्गाच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण झाला. तसेच क्रेझी केसलमध्ये नाग नदीच्या पात्राची रुंदी कमी करण्यात आली. परिणामी, विर्सगाचे पाणी अंबाझरी लेआऊट, यशवंतनगर, डागा लेआऊट, कॉर्पोरेशन कॉलनी, शंकरनगर तसेच इतर वस्त्यांमध्ये शिरले.

हेही वाचा : उद्योग, रोजगाराच्या प्रश्नांमुळे पीछेहाट; उपराजधानीत साधनसंपत्ती असूनही विकास संथगतीने

प्रशासनाकडून आचारसंहितेचे कारण

याबाबत नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर सरकारने सुरक्षेच्या उपाययोजना करण्यासाठी २०४ कोटी रुपये मंजूर केले. परंतु निविदा प्रक्रिया रखडली आहे. त्यासाठी लोकसभा निवडणुकीचे कारण दिले जात आहे. तसेच विसर्गाच्या प्रहावाला अडथळा येत असल्याचे लक्षात आल्यानंतर विवेकानंद स्मारक पूर्णत: किंवा अशंत: स्थानांतरित करण्याचा निर्णय अभ्यासाअंती घेण्यात येणार असल्याचे सिंचन खात्याने म्हटले आहे.

हेही वाचा : नागपूर : मित्रांनी दारूच्या वादातून केली कुणालची हत्या.. वानाडोंगरीतील घटनेचा अखेर उलगडा

१५ जूनपर्यंत नद्यांची स्वच्छता करणार

शहरातील नागनदीसह पिवळी आणि पोहरा नदी स्वच्छतेचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. त्या कामाची पाहणी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी नुकतीच केली. अंबाझरी टी पॉईंट ते दहनघाटापर्यंत नागनदीचे पात्र १७ मीटर रुंद करणार, विवेकानंद स्मारकापुढील पूल नव्याने बांधणार, १५ जूनपर्यंत तीनही नद्यांची स्वच्छता पूर्ण करणार असा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे.