नागपूर : स्मार्ट झालेला फोन आता जीवनाचा अविभाज्य घटक बनत आहे. या फोनवर बोलताना अनेकांना कशाचेच भान रहात नाही. अवती भवती सुरू असलेल्या गोष्टीकडेही लक्ष नसते. फोनवर बोलताना रस्ता ओलांडणारे अनेकजण आपण सर्वत्र पहातो. यातून अनेकदा अपघात घडतात आणि त्याची किंमत मोजावी लागते. असाच काहीसा प्रकार गुरुवारी नागपुरात घडला.

एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी पुणे येथून नागपुरात आलेल्या एका तरुणाला फोनवर बोलण्याच्या नादात कशाचेच भान राहिले नाही. गाफीलपणे हा तरुण लिफ्टसाठी तयार केलेल्या खड्ड्यात पडून दगावला. अंत्यविधीसाठी आलेल्या या तरुणाला आपल्याच गाफीलपणामुळे जगाचा असा निरोप घ्यावा लागला. सर्वश्री नगरातील एका निर्माणाधीन इमारतीत सुरू असलेल्या लिफ्टच्या खड्ड्यात ही घडना घडली. राजेश गोविंद जगताप असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. पुणे जिल्ह्यातल्या चिखली येथील गोकूळ सोसायटीत राहणारे राजेश हे दोन दिवसांपूर्वी नातेवाईकाच्या एका अंत्यविधीसाठी नागपूरात आले होते. ज्या इमारतीतल्या लिफ्टच्या खड्ड्यात पडून राजेश यांचा मृत्यू झाला त्याच इमारतीच्या शेजारी त्यांच्या भावाचे घर आहे.

मंगळवारी रात्री राजेश ज्या लिफ्टच्या खड्ड्यात कोसळले ती इमारत शेजारी आहे. सोसायटीतल्या या लिफ्टचे काम देखील पूर्ण झालेले नाही. त्यामुळे तो भाग तसाच उघडा पडला आहे. मंगळवारी रात्री राजेश यांना एक फोन आला. त्यावर बोलता बोलता राजेश घरातून बाहेर आले. बोलण्याच्या नादात ते शेजारच्या निर्माणाधीन इमारतीत गेले. तिथेही त्यांना बांधकाम सुरू असल्याचे भान नव्हते. गाफील असल्याने बोलता बोलता ते पहिल्या माळ्यावर गेले. इथेही त्यांना लिफ्टचा खड्डा दिसला नाही आणि तोल गेल्याने ते खडड्यात पडले.

डोक्याच्या भारावर पडल्याने राजेश यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी आलेल्या राजेश जगताप यांच्यावरच दबा धरून बसलेल्या काळाने अशी झडप घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.