नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या नवेगाव बफर क्षेत्रात तब्बल चार ते पाच वर्ष साम्राज्य गाजवणारा ‘छोटा मटका’ हा वाघ आता नागपूर येथील गोरेवाडा बचाव केंद्रात उपचार घेत आहे.

तो बरा होऊन त्याने निर्माण केलेल्या साम्राज्यात परत जाऊ शकेल का, याचीही शाश्वती नाही. तो पूर्णपणे बरा होऊन परत गेला तरीही त्याला त्याचे साम्राज्य परत मिळेल का, हा देखील प्रश्न आहे. मात्र, काळ थांबत नसतो आणि साम्राज्यही कुणासाठी थांबून राहात नाही असे म्हणतात. ताडोबा बफरच्या या अनभिषिक्त सम्राटाने निर्माण केलेल्या साम्राज्यावर मात्र आता इतरांनी हक्क दाखवण्यास सुरुवात केली आहे. ‘मोगली’ हा वाघ आणि ‘चांदणी’ ही वाघीण ‘छोटा मटका’च्या साम्राज्यावर हळूहळू अधिकार गाजवू लागले आहे.

या साम्राज्यावरील त्यांचा अलीकडचाच एक व्हिडिओ वन्यजीव अभ्यासक व छायाचित्रकार दीप काठीकर यांनी चित्रीत केला.

‘छोटा मटका’ हे नाव जगभरातील पर्यटकप्रेमीच्या तोंडावर आहे. ‘बजरंग’ या शक्तीशाली वाघाला त्याने युद्धात चारीमुंड्या चीत करुन यमसदनी धाडले. त्याचवेळी तो सर्वाधिक प्रकाशात आला. ज्याने आता त्याच्या या साम्राज्यावर आपला हक्क दाखवण्यास सुरुवात केली, त्या ‘मोगली’ या वाघाला देखील कधीकाळी ‘छोटा मटका’ या वाघाने गंभीर जखमी केले. त्यामुळे तो असेपर्यंत त्याच्या या साम्राज्यावर हक्क दाखवण्याचा क्वचितच कुणी प्रयत्न केला आणि ज्याने केला, ज्याला ‘छोटा मटका’ने चांगलीच मात दिली. त्यामुळे कोणत्याही वाघाने त्याच्या या साम्राज्यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न नंतर कधी केला नाही.

‘ब्रम्हा’ या वाघाला यमसदनी धाडल्यानंतर मात्र ‘छोटा मटका’ चांगलाच जखमी झाला. मृत्युच्या दाढेत तो देखील उभा होता. त्यामुळे त्याच्यावर उपचाराची नितांत गरज होती. नैसर्गिकरित्या तो ठीक होण्याची शक्यता मावळली आणि वनखात्याने त्याला उपचारासाठी ताब्यात घेतले. मात्र, यादरम्यान त्याचे तीन सुळे दात तुटले, पायाला भला मोठाचीरा गेल्याने मोठी जखम झाली. त्याच्यावर आता उपचार सुरु आहेत. मात्र, तो त्याच्या साम्राज्यात परतेल का, याचे उत्तर आताच देता येणार नाही. दरम्यान, इतर वाघांनी मात्र तो नसल्याची खात्री पटल्यानंतर त्याने निर्माण केलेले साम्राज्य बळकावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

‘मोगली’ आणि ‘चांदणी’ हे दोघेही वाघ आणि वाघीण सातत्याने त्याच्या साम्राज्यात आढळून येत आहेत. त्यामुळे ‘छोटा मटका’च्या साम्राज्याचा अस्त होण्याची चाहूल पर्यटकांना लागली आहे.