नागपूर : राज्यातील जंगलांत वाघांच्या अनाथ बछड्यांची व त्यांच्या मृत्यूची संख्या गेल्या काही महिन्यांत वाढली आहे. वाघिणींचाही (बछड्यांच्या आईचा) काहीच ठावठिकाणा लागत नसल्याने त्या बहेलिया शिकाऱ्यांना बळी पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मंगळवारी भंडारा वनक्षेत्रात आढळलेल्या दोन्ही बछड्यांचा मृत्यू झाल्याने या टोळीवरील शंका अधिक गडद झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर प्रादेशिक वनखात्यांतर्गत देवलापार येथे ८ जानेवारीला वाघाच्या बछड्याचा मृतदेह आढळला. तर १५ जानेवारीला याच ठिकाणी आणखी एका बछड्याचा मृतदेह आढळला. आणखी एक बछडा याच ठिकाणी अतिशय आजारी अवस्थेत आढळला. या बछड्यावर प्रादेशिक वनखात्याच्या ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रात उपचार सुरू आहेत. हे तिन्ही बछडे अवघ्या ५ ते ६ महिन्यांचे होते. तर काही महिन्यांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्रप्रकल्पाजवळही वाघाचा अनाथ बछडा आढळून आला, ज्याला जिल्ह्यातीलच करुणाश्रम येथे नेण्यात आले.

भंडारा वनविभागाअंतर्गत लेंडेझरी वनक्षेत्रातील सहवनक्षेत्र आलेसुर (नियतक्षेत्र खापा, मौजा मांडवी) येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास बावनथडी कालव्याला लागून शेतामध्ये वाघाचा बछडा मृत अवस्थेमध्ये आढळून आला. माहिती मिळताच वन अधिकारी, वन कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. वाघाच्या मृत बछड्याजवळ दुसरा समवयस्क वाघ बछडा अशक्त अवस्थेत सापडला. त्याला भंडारा वनविभागाच्या शीघ्र बचाव पथकाच्या मदतीने पुढील उपचारासाठी नागपूर येथील गोरेवाडा बचाव केंद्रात हलवण्यात आले. मात्र, त्याठिकाणी त्याचा मृत्यू झाला. हे दोन्ही बछडे तीन ते चार महिन्यांचे होते. वाढते मृत्यू आणि शिकारी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याची मागणी जोर धरत आहे.

बहेलियांचा विदर्भात तळ!

देवलापार, पवनी, मोगरकसा, लेंडेझरी, जामकांदरी ते तुमसर या पट्ट्यात वाघांची संख्या मोठी आहे. याच पट्ट्यात अनाथ व मृत बछडे सापडले आहेत. बछड्यांचे मृत्यू हे उपामसारीमुळे झाले. येथूनच वाघिणीही बेपत्ता आहेत. गेल्या काही महिन्यांपासून बहेलियांनी विदर्भात तळ ठोकल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यांनीच या वाघिणीची शिकार केल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur vidarbha tiger reserves hunting of tigresses increase in the number of orphaned cubs rgc 76 css