नागपूर : पतीच्या निधनानंतर सासरच्या मंडळींनी त्रास दिल्यामुळे विधवा महिला हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला आली. पोलीस ठाण्यातच भेटलेल्या एका युवकाने तिला मदत करण्याचा बहाणा करुन प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यानंतर अविवाहित असल्याचे सांगून लग्नाचे आमिष देऊन तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी तक्रारीवरुन बलात्कारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. वसीम सैयद कलीम सैयद (४५, रा. ताजनगर, तुकडोजी पुतळा चौक) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला अंजली (बदललेले नाव) हिचे २०२४ मध्ये अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंद्रमणीनगरात राहणाऱ्या युवकाशी लग्न झाले. तिचा पती खासगी काम करीत होता. आईवडिलांशी पटत नसल्यामुळे पती-पत्नीने मेहनत करुन बाहादुरा परीसरात घर बांधले. त्यांना एक मुलगा व मुलगी झाली.

सुखाने संसार सुरु असतानाच पतीचा ‘ब्रेन हँमरेज’मुळे मृत्यू झाला. त्यावेळी सासरी असलेली वडिलोपार्जीत संपत्तीवरील हक्क सोडण्यासाठी सासरची मंडळी घरी घेऊन वाद घालायला लागली. अनेकदा अंजलीला सासरच्या मंडळीने मारहाण केली. सासरच्या जाचाला कंटाळूून ती आत्याला सोबत घेऊन हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली.

हुडकेश्वर पोलिसांनी तक्रार लिहून घेतली आणि गुन्हा दाखल केला. यादरम्यान, पोलीस ठाण्यात उपस्थित असलेला आरोपी वसीम सैयद (४५) याने अंजलीशी ओळख केली. तिला पोलीस ठाण्याच्या कामात मदत करण्याचे आमिष दाखवले. तसेच सासरकडून मिळालेल्या घराचा सौदा करुन विक्री करुन देण्याचा विश्वास दर्शविला.

त्या माध्यमातून वसीम आणि अंजली यांचे नेहमी फोनवरुन बोलणे व्हायचे. अंजली ही दोन मुलांसह एकटीच राहत असल्याचे वसीमने हेरले. त्याने अंजलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला अविवाहित असल्याचे सांगितले. दोन्ही मुलांचा सांभाळ करुन लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यावर ती भाळली.

वसीमने तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. गेल्या तीन वर्षांपासून अंजलीचे लैंगिक शोषण करणे सुरु केले. वसीमने अंजलीचे ९ लाख रुपयांत घर विकले आणि ७ लाख रुपयांत एक भूखंड विकला. अशाप्रकारे १६ लाख रुपये घेऊन वसीमने अंजलीची फसवणूक केली.

प्रियकर निघाला विवाहित

अंजली आणि वसीमने हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत किरायाने खोली करुन ‘लिव्ह अँड रिलेशनशिप’मध्ये राहायला लागले. अंजलीने वसीमला वारंवार लग्नासाठी तगादा लावला. त्याने प्रत्येकवेळी काहीतरी कारण सांगून टाळाटाळ केली. तसेच तो आठवड्यातून फक्त दोनच दिवस घरी यायला लागला. त्यामुळे अंजलीला संशय आला. तिने वसीमवर नजर ठेवून त्याचे घर गाठले. घरात त्याची पत्नी आणि पाच मुले दिसून आली. प्रियकर विवाहित असल्याची माहिती मिळताच दोघांमध्ये वाद झाला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur widow raped on the pretext of marriage adk 83 asj