वर्धा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे शताब्दी वर्ष. यानिमित्याने अनेक बाबींना उजाळा मिळत आहे. संघाच्या प्रार्थनेबाबत पण चर्चा सूरू झाली आहे. सुपरिचित ‘ नमो वत्सले ‘ या प्रार्थनेला नवा साज नुकताच चढविण्यात आला. प्रार्थनेचा ध्वनीचीत्रफीत प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला.
संगीतकार राहूल कानडे यावेळी बोलतांना म्हणाले की प्रार्थनेस लंडनच्या रॉयल फलॉरमेनिक ऑर्केस्ट्राचे संगीत दिल्या गेले आहे. संघाची प्रार्थना लिहल्या गेली तेव्हा ब्रिटिश राज्यकर्ते होते. आता ८५ वर्षानंतर ब्रिटिश कलावंतांकडून भारत मातेचे वाद्य वाजल्याने या प्रार्थनेस न्याय दिल्याची भावना आहे. सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी गायन केले. या प्रार्थनेस मंत्राचे सामर्थ्य मिळाल्याची भावना सरसंघचालक मोहन भागवत यांनी याप्रसंगी व्यक्त करीत १९३९ पासून ही प्रार्थना गायल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
१९३९ पासून ही प्रार्थना गायल्या जात असल्याचा संदर्भ भागवत यांनी दिला. तर मग त्यापूर्वी ? हा प्रश्न येतो. १०० वर्षांपूर्वी संघाची स्थापना झाली तेव्हा पण प्रार्थना होतीच. म्हणून संघाची ती मूळ प्रार्थना म्हटल्या जाते.
नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी
नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी
नमो धर्मभूमी जियेच्याच कामी
पडो देह माझा, सदा ती नमी मी
या सोबतच हिंदीतील चार ओळीचे पद पण म्हटल्या जात होते. या प्रार्थनेनंतर ‘ राष्ट्रगुरू श्री समर्थ रामदास स्वामी की जय ‘ असा जयघोष केल्या जात असे. पुढे एक घडामोड झाली. वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे येथील मालगुजार नानासाहेब टालाटूले यांच्या वाड्यावर १९३९ साली फेब्रुवारी महिन्यात संघाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. तत्कालीन संघचालक डॉ. हेडगेवार, गोलवळकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, आप्पाजी जोशी, विठ्ठलराव पत्की, तात्याराव पत्की, बाबाजी सालोडकर, कृष्णराव मोहरील असे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. यात १९२६ ते १९३९ दरम्यान झालेल्या संघ कार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच मराठी संघ प्रार्थना बदलून ती संस्कृतमध्ये करण्याचा निर्णय झाला. संस्कृत विद्वान नरहरी भिडे यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली.
भिडे यांनीच नमस्ते सदा वत्सले मातृभूमी ही प्रार्थना रचली. प्रार्थनेत बदल करण्याचे कारण होते. एक तर संघाचा झालेला विस्तार. दुसरी बाब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची शाही मोहोर ही संस्कृत भाषेत होती. यच्चावत सर्व विदेशी आक्रमणकारी यांनी त्यांची भाषा ईथे लादण्याचा प्रयत्न करूनही संस्कृत भाषा त्यास पुरून उरत देशभर टिकली होती. या भाषेची ओळख देशभर असल्याने याच बैठकीत संघ प्रार्थना संस्कृतमध्ये करण्याचा निर्णय झाला, अशी माहिती ज्येष्ठ संघ कार्यकर्ते अविनाश देव देतात. तसे लेखी संदर्भ असल्याचे त्यांनी नमूद केले.
संघ शाखात दिल्या जाणारे मराठी व हिंदी भाषेतील निर्देश पण यापुढे संस्कृत भाषेतच देण्याचा निर्णय झाला. अश्या अर्थाने संघाच्या प्रार्थनेचा पाळणा वर्धा जिल्ह्यात हलला, असे म्हटल्या जाते. नवी प्रार्थना पूणे येथे शिबिरात प्रथम म्हटल्या गेली. अनंतराव काळे यांनी गायन केले. सार्वजनिक स्वरूपात ही प्रार्थना सर्वप्रथम १८ मे १९४० रोजी नागपूर येथे आयोजित संघ शिक्षा वर्गात म्हटल्या गेली. संघ प्रचारक यादवराव जोशी यांनी ती सादर केली. संपूर्ण प्रार्थना संस्कृत भाषेत तर एक नारा, भारत माता की जय, हिंदीत होता. तेव्हापासून हीच प्रार्थना देशाभारतील संघ शाखेत गायल्या जात आहे. मूळ प्रार्थना डॉ. हेडगेवार यांनी तयार केली होती. त्या काळात नागपुरात हिंदीमिश्रित मराठी बोलल्या जात असे. म्हणून मूळ प्रार्थनेत हिंदी शब्द पण आलेत. संघात बदल सहजासहजी होत नाही. म्हणून ही मूळ प्रार्थना १९३९ पर्यंत संघाच्या कार्यक्रमात म्हटल्या गेली, असा संदर्भ दिल्या जातो.