वर्धा : जिल्ह्यात संततधार वृष्टीने नदी, नाले ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे काही दुर्घटना पण घडत असल्याचे निदर्शनास आले. वर्धा जिल्ह्यातील देऊरवाडा येथील नदीपात्रात एकाचा, तर खैरी धरणातील पाण्यात मासे पकडताना वाहून गेलेल्या युवकाचा, असे दोन मृतदेह आढळून आले. अमरावतीत गोपाळनगरात राहणारे हरीश मुरलीधर चरोडे यांनी आर्वीलगत देऊरवाडा येथील नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची बाब उजेडात आली आहे. ते किराणा व्यावसायिक होते. चरोडे हे सोमवारी कौडन्यपूर येथे दर्शनासाठी जात असल्याचे सांगत घरून निघाले होते. सायंकाळी ७ वाजता त्यांनी मोबाईलवार पत्नीशी बोलणे केले. त्यानंतर आत्महत्या केली असण्याची शंका पोलीस व्यक्त करतात. मंगळवारी पण ते घरी परत नं आल्याने त्यांची शोधाशोध सूरू झाली. मोबाईलवर संपर्क होत नव्हता. म्हणून मग नातेवाईक व मित्रांनी आर्वीकडे धाव घेतली. तेव्हा नदीकाठी चरोडे यांची स्कुटी दिसून आली. मोबाईल व चिठ्ठी या गाडीत आढळली. देऊरवाडा येथील नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला. पट्टीच्या पोहणाऱ्यास बोलावून तो काढण्यात आला. आर्वी पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. स्कुटीत सापडलेल्या चिठ्ठीत नेमके काय लिहून आहे, याचा तपशील देण्यास पोलिसांनी नकार दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : चंद्रपूर : कर्ज फेडण्यासाठी खंडणी वसुलीचा डाव, दुकानासमोर ठेवला बनावट बॉम्ब

दुसऱ्या एका घटनेत मासे पकडण्याच्या मोहात अजय सलामे हा युवक पुरात वाहून गेला. ७२ तासाच्या शोधाअंती त्याचा मृतदेहच हाती लागला. तो नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील खराळा येथील रहिवासी होता. या गावातील काही युवक रविवारी कारंज्यातील खैरी धरण परिसरात सहलीवर आले होते. त्यातील अजय यांस पाण्यात उतरून मासे पकडण्याचा मोह झाला. नदीच्या पात्रात उतरल्यावर पाण्यास वेग असल्याने तो वाहून गेला. त्याला वाचविण्याचा प्रयत्न गावकरी व मित्रांनी केला. पण प्रवाह मोठा असल्याने धरण भिंतीपासून तीन किलोमीटर पर्यंत वाहत गेला. घटना माहित होताच प्रशासनाने शोध मोहीम सूरू केली. नागपुरातून बचाव पथक बोलाविण्यात आले. सोमवारी तसेच मंगळवारी दुपारपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. पथकातील २६ जवान त्याचा नावेत बसून कसून शोध घेत होते. अखेर तिसऱ्या दिवशी परसोडी गावाजवळ अजयचा मृतदेह सापडला. मृतदेह बाहेर काढण्यासाठी गावातून ट्रॅक्टर बोलावण्यात आला. मृतदेह कारंजा कारंजा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी झाल्यावर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. मृत अजय यांस आईवडील नसून त्याचे मामा व अन्य नातेवाईक घटनास्थळी पोहचले होते. एकाची आत्महत्या तर दुसऱ्याचा नाहक जीव गेल्याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर परत सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In wardha two drowned in different incidents at deurwada river and khairi dam pmd 64 css
Show comments