नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या निकालात नागपूर विभागाने मागिल वर्षाच्या तुलनेत १.७७ टक्क्यांनी वाढ केली आहे. परंतु, राज्यात नागपूर विभाग ९२.१२ टक्क्यांसह आठव्या क्रमांकावरच आहे. नागपूर विभागामध्ये सर्वाधिक कॉपीची प्रकरणे आढळणारा गोंदिया जिल्हा ९५.२४ टक्क्यांनी अव्वल ठरला आहे. तर वर्धा जिल्ह्याचा निकाल ८९.४० टक्यांसह सर्वात कमी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना काळात मिळालेले गृह परीक्षा केंद्र, कमी अभ्यासक्रम आणि अतिरिक्त वेळ या सवलतींचा फायदा घेत विद्यार्थ्यांनी दोन वर्षे शिक्षण मंडळाच्या मागील वर्षीच्या निकालात भरारी घेतली होती. यामुळे नागपूर विभागाच्या निकालातही वाढ झाली होती. मात्र, सवलती बंद होताच नागपूर विभागाच्या निकालाची टक्केवारी कमी झाली हाेती. यंदा विभागाने काहीशी कामगिरी सुधारली आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये नागपूर विभागाचा निकाल ९०.३५ टक्के होता. यात आता १.७७ टक्के वाढ होऊन ९२.१२ झाला आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान घेण्यात आली होती. यामध्ये विभागातून १ लाख ५६ हजार ३४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १ लाख ५५ हजार ३७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ४३ हजार १३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ९२.१२ इतकी आहे. करोना काळात नागपूर विभागाच्या निकालाची टक्केवारी ही ९७ टक्क्यांपर्यंत गेली होती. मात्र, दोन वर्षांपासून या सवलती बंद होताच निकालात घसरण झाली आहे. नागपूर विभागनिहाय विचार केल्यास गोंदिया जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ९५.२४ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९७.०८ टक्के तर सर्वात कमी कला शाखेचा निकाल ८६.११ टक्के लागला आहे.

हेही वाचा – अमरावती विभागाचा बारावीचा निकाल ९३ टक्‍के; उत्‍तीर्णतेच्या टक्‍केवारीत राज्‍यात सातवे स्‍थान

सर्वच विभागात मुली अव्वल

मंगळवारी दुपारी १ वाजता राज्य शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. सर्वच विभागांमध्ये मुलींची निकालाची टक्केवारी ही मुलांच्या तुलनेत सर्वाधिक राहिली आहे. नागपूर विभागाच्या निकालात मुलांची टक्केवारी – ८९.८५ टक्के तर मुलींची टक्केवारी ९४.४६ इतकी आहे.

हेही वाचा – सोन्याच्या दरात बदल, हे आहेत आजचे दर…

विभागाची स्थिती

एकूण नोंदणी- १,५६,३४२

परीक्षा देणारे विद्यार्थी- १,५५,३७४

उत्तीर्ण विद्यार्थी – १,४३,१३१

एकूण टक्केवारी – ९२.१२

गोंदिया – ९५.२४

गडचिरोली – ९४.४२

भंडारा – ९२.१९

चंद्रपूर – ९३.८९

नागपूर – ८९.९३

वर्धा – ८९.४०

नागपूर शाखानिहाय निकाल

विज्ञान- ९७.०८

वाणिज्य – ८७.२८

कला – ८६.११

एमसीव्हीसी – ८७.६१

आयटी – ८०.९७

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in nagpur division 12 result the division ranks eighth in the state dag 87 ssb