नागपूर: महिलाही पुरुषांपेक्षा कुठेही कमी नाही आहेत हे एकदा पुन्हा सिद्ध झालेले आहे. विदेशातील अनेक नामवंत कंपन्यांमध्ये भारतीय पुरुष आपला ठसा उमट होत असतानाच नागपूरच्या एका महिलेने ऑस्ट्रेलियातील नामवंत कंपनीमध्ये सीईओ होण्याचा मान मिळवला आहे. ऑस्ट्रेलियातील प्रख्यात ब्रुअरी कंपनी लायनने (एलआयओएन) आपल्या १८० वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची (सीईओ) नियुक्ती केली आहे. एक्सएक्सएक्सएक्स आणि लिटल क्रिएटर्स यांसारख्या लोकप्रिय बीअर बॅण्ड्सची मालकी असलेल्या लायन कंपनीने अनुभा सहस्रबुद्धे यांना सीईओ पदावर नियुक्तीची घोषणा केली आहे. त्याचबरोबर कंपनीने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील व्यवसाय एकत्रित करून लायन एन्झ नावाचे नवीन बिझनेस युनिट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
मूळचे नागपूरकर असलेले डॉ. रवींद्र सहस्रबुद्धे आणि डॉ. शीला सहस्रबुद्धे यांची कन्या अनुभा ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाली आहे. डॉ. रवींद्र आणि डॉ. शीला सहस्रबुद्धे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय नागपूर (मेडिकल) येथून वैद्यकीय शिक्षण घेतले आहे. सहस्रबुद्धे कुटुंब १९७३ पासून ऑस्ट्रेलियातील सिडनीजवळील विंडसर शहरात स्थायिक झाले आहेत. त्यांची कन्या अनुभा या लायनच्या चीफ ग्रोथ अॅण्ड कमर्शियल ऑफिसर पदावर असून, लायन ऑस्ट्रेलिया कंपनीच्या सह-प्रमुख आहेत.
२०२१ मध्ये लायनमध्ये दाखल होण्यापूर्वी त्यांनी जवळपास दोन दशके कोका-कोला कंपनी आणि मार्स रिग्ले या जागतिक कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांवरील जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. आशिया पॅसिफिक आणि उत्तर अमेरिकेतील बाजारपेठांमध्ये बॅण्ड व्यवस्थापन, विपणन धोरण आणि ग्राहक-केंद्रित उपक्रमांमध्ये त्यांनी अनुभव मिळविला आहे. अनुभा सहस्रबुद्धे १ ऑक्टोबर २०२५ पासून सीईओपदाची सूत्रे स्वीकारतील. विद्यमान सीईओ सॅम फिशर यांचा कार्यकाळ ऑक्टोबर अखेरीस संपणार आहे. नामांकित मद्य निर्मिती करणाऱ्या लायन कंपनीतील या बदलामुळे एकीकडे महिला नेतृत्वाला मान मिळाला असून, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड बाजारपेठेत लायनची ताकद वाढेल, असा उद्योगतज्ज्ञांचा अंदाज आहे. नवीन लायन एन्झ युनिटमुळे कंपनीच्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील कामकाजाचे एकत्रीकरण होणार आहे.
अनुभा ही लहानपणापासूनच अभ्यासात हुशार आहे. एलएलबी आणि बॅचलर ऑफ बिझिनेस मॅनेजमेंटची पदवी घेतल्यानंतर तिला नामांकित कंपन्यांकडून मोठमोठ्या पदावर ऑफर आल्या. अनुभा ही एवढ्या कमी वयात नामांकित कंपनीच्या सीईओ पदाची जबाबदारी सांभाळत असल्याने आम्हाला खूप अभिमान आहे. तिच्या निर्णयाचे स्वागत असून, तिला कुटुंबाकडून नेहमीच प्रोत्साहन देण्यात आले. ” -डॉ. रवींद्र सहस्रबुद्धे (अनुभाचे वडील)
व्यावसायिक इतिहासात प्रथमच भारतीय महिलेकडे नेतृत्व
आम्ही लायन कंपनीच्या वाढीसाठी मजबूत प्लॅटफॉर्म उभा केला आहे. आमच्या जागतिक दर्जाच्या बॅण्ड्स, डिजिटल परिवर्तन, उत्पादन नवकल्पना आणि पुरवठा साखळी मजबूत करून ग्राहकांशी भागीदारी सुधारली आहे. आयकॉनिक बॅण्ड्सना नव्या उंचीवर नेले जाईल. त्यामुळे ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये व्यवसाय वाढीला मदत होईल, असे अनुभा सहस्रबुद्धे, लायन कंपनीच्या सीईओ यांनी सांगितले.