चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याची कन्या धन्यनेश्वरी दुणेदार हिने आपल्या उंचीमुळे जगात इतिहास रचला आहे. फक्त २.३ फूट उंची असलेल्या धन्यनेश्वरीचे नाव इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये जगातील सर्वात कमी उंचीची महिला म्हणून नोंदविण्यात आले आहे. ही संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.

ब्रम्हपुरी तालुक्यातील परसोडी या गावातील रहिवासी असलेली धन्यनेश्वरी हिचे आईवडील शेती करतात. तिची एक बहिण चंद्रपूर येथे वास्वव्याला आहे. सध्या ती बहिणीकडेच मुक्कामी आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील आदर्श अपंग विद्यालयात बी.ए. प्रथम वर्षाची विद्यार्थीनी असलेली धन्यनेश्वरी दररोज शाळेत बसने ये-जा करते. शिक्षणाची आवड असल्याने वणी येथे जाणे येणे करतांनच एक दिवस योगायोगाने अलंकार सावळकर व योगेश गोखरे या दोघांना धन्यनेश्वरी रस्त्यावर भेटली. संवादा दरम्यान तिची उंची खूपच कमी असल्याचे जाणवले. त्यानंतर त्यांनी तिची उंची मोजली व तिचे नाव इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंदविण्याचा निर्धार केला. त्यांच्या प्रयत्नांतून धन्यनेश्वरीचे नाव इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदविले गेले आणि आज चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते धन्यनेश्वरीला अधिकृत सर्टिफिकेट व मेडल प्रदान करण्यात आले.

“मला कधी वाटले नव्हते की माझी कमजोरीच माझी ताकद बनेल. अलंकार व योगेश यांच्या मदतीने मला हा किताब मिळाला आहे. माझे आई-बाबा आणि संपूर्ण कुटुंब आनंदी आहे. आम आदमी पार्टी, चंद्रपूर यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आणि जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतःच्या हस्ते सन्मान दिल्याबद्दल मी मनःपूर्वक आभार मानते.” अशी प्रतिक्रिया धन्यनेश्वरी दुणेदार हिने व्यक्त केली.

या कार्यक्रमाला अलंकार सावळकर, आपचे प्रदेश सहसचिव सुनील मुसळे, आपचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे, योगेश गोखरे, तब्बसूम शेख, एकनाथ खांडेकर, संतोष बोपचे, तसेच धन्यनेश्वरीचे आई-बाबा, नातेवाईक व आपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ऐतिहासिक यशामुळे चंद्रपूर जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले आहे. तिच्या या यशाच्या प्रवासात अलंकार सावळकर व आम आदमी पार्टी चंद्रपूर महानगर अध्यक्ष योगेश दे. गोखरे यांचे विशेष योगदान आहे. कमी उंचीमुळे अनेकदा लोकांकडून तिची टंगल टवाळी केली जाते, लोक गंमतही करतात. मात्र त्याचे तिला काहीही वाईट वाटत नाही. आज उंची कमी असल्यामुळेच जगातिल सर्वात कमी उंचीची महिला अशी नोंद घेतल्या गेल्याचे ती आनंदाने सांगते.