गडचिरोली : मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत घसरगुंडी झाल्यानंतर समोर होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे भाजपपुढे आव्हान निर्माण झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री असल्याने यात अधिक भार पडली असून आजी-माजी खासदार आमदारांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कुरघोड्यांचा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्ती केली जात आहे.

एकेकाळी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात २०१४ नंतर भाजपने मुसंडी मारली. तिनही विधानसभा आणि लोकसभा काबीज करीत एकहाती सत्ता स्थापन करण्यात त्यांना यश आले. मात्र, २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगलाच फटका बसला. लोकसभेत अशोक नेते यांना दारुण पराभव पत्करावा लागला. तर विधानसभा निवडणुकीत केवळ गडचिरोलीतून उमेदवार निवडून आणता आला. पक्षाच्या या पीछेहाटीमागे गटबाजी कारणीभूत असल्याची चर्चा त्यावेळी होती. यामुळेच कार्यकाळ संपण्याआधीच भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांची गच्छंती झाली. त्यांच्या जवळील नेत्यानेच ऐनवेळी विद्यमान जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांचे नाव पुढे केले होते. विधानसभेचे तिकीट नाकारल्याने काही काळ नाराज असलेले माजी आमदार डॉ. देवराव होळी पुन्हा सक्रिय झाले आहे. मात्र, त्यांनी जनता दरबार घेत विद्यमान आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे चित्र आहे.

माजी खासदार अशोक नेते यांच्यासोबत माजी आमदार डॉ. देवराव होळी आणि माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्यासोबत असलेले सख्य सर्वश्रुत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी वाटपादरम्यान खटके उडण्याची चिन्हे आहे. दुसरीकडे आरमोरी विधानसभेतही सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार आणि प्रकाश पोरेड्डीवार यांचाही पक्षात वरचष्मा आहे. मात्र, विधानसभेत जागा गमवावी लागल्याने त्यांना धक्का बसला होता. याची भरपाई ते स्थानिक स्वराज्य संस्थांनाच्या निवडणुकीत भरून काढतात का, याकडे देखील राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. मुख्यमंत्री पालकमंत्री असतानाही गडचिरोली भाजपमध्ये सुरु असलेली गटबाजी आणि अंतर्गत कुरघोड्यांमुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. त्यामुळे याचा फटका आगामी निवडणुकांमध्ये बसू शकतो असे राजकीय जाणकार सांगतात.

तरुण फळीकडून नेतृत्व हातात घेण्याच्या हालचाली

राजकारणात नवखे असलेले आणि पहिल्यांदाच विधानसभेत निवडून आलेले गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी गटबाजी कडे लक्ष न देता जुन्या नाराजांना जोडण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. याचाच एक भाग म्हणून नरोटे यांनी नुकतीच मुंबई येथे अम्ब्रीशराव आत्राम यांची भेट घेत चर्चा केली. दोघांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सोबतच प्रकाश पोरेड्डीवार यांना भेटून त्यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. गटबाजीमुळे शांत असलेले कार्यकर्ते आणि नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांना पक्षात पुन्हा सक्रिय करण्याचा प्रयत्न डॉक्टर नरोटे करीत आहे. त्यामुळे भविष्यात गडचिरोली भाजपचे नेतृत्व डॉ. नरोटे आणि आत्राम या तरुण नेत्यांनी घ्यावे अशी अपेक्षा भाजपच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.