‘जी-२०’ अंतर्गत ‘सी-२०’ (सिव्हिल सोसायटी/ नागरी समाज संस्था) गटाच्या दोन दिवसीय परिषदेला सोमवारी नागपूर येथे सुरुवात झाली. परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर ‘सी-२०’ समितीच्या अध्यक्ष माता अमृतानंदमयी, रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, विजय नंबियार, अलेस्सान्ड्रा निलो (ब्राझील), ए. माफ्टय़ूचान (इंडोनेशिया) विवेकानंद केंद्र, कन्याकुमारीच्या उपाध्यक्ष निवेदिता भिडे आदी उपस्थित होते.
यावेळी सत्यार्थी म्हणाले, जागतिक पातळीवर समाजावर जो अन्याय होत आहेत तो दूर करण्यासाठी आपण पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यासाठी अधिक सर्वसमावेशक आणि गतिशील संयुक्त राष्ट्रांची गरज आहे. याचाच अर्थ सुरक्षा परिषद अधिक सर्वसमावेशक असणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हा लढा लढला गेला पाहिजे. भारत हा देश करुणेसाठी ओळखला जातो. या करुणेचे वैश्विकीकरण व्हायला हवे. भारतात शंभर समस्या असतील, पण येथे एक अब्ज उपाय देखील आहेत. ‘सी-२०’ अध्यात्माच्या मूलभूत मूल्यांवर आधारित आहे. पण, अध्यात्म म्हणजे येथे धर्म अपेक्षित नाही. ती मानवतेची प्रेरक शक्ती आहे, असेही ते म्हणाले.
नागरी संस्थांची भूमिका महत्त्वाची – फडणवीस
जागतिकीकरणाच्या काळात जग जवळ येत असले तरी लोकांचे जीवनमानाचे प्रश्न वाढतच आहेत. त्यामुळे जागतिकीकरणाला योग्य दिशा दिल्यास ‘वसुधैव कुटुम्बकम’ ही संकल्पना साकारली जाऊ शकते व यासाठी नागरी संस्थांची भूमिका महत्त्वाची ठरते, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शेवटच्या व्यक्तीचा आवाज सरकापर्यंत पोहचवण्याची जबाबदारी ही नागरी संस्थांचीच आहे व सरकारनेही तो आवाज ऐकणे गरजेचे आहे, असेही फडणवीस म्हणाले.
परिषदेला ‘वसुधैव कुटुम्बकम’चे रूप – सहस्रबुद्धे
परिषदेत एकूण ३५७ प्रतिनिधी सहभागी झाले असून त्यात २६ देशातील ११३ तर उर्वरित भारतीय प्रतिनिधींचा समावेश आहे. देशविदेशातील प्रतिनिधींच्या सर्वसमावेशक सहभागाने या परिषदेला खऱ्या अर्थाने ‘वसुधैव कुटुम्बकम’चे रूप आले, असे डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी सांगितले.