लोकसत्ता टीम

बुलढाणा: ऑगस्ट महिना अखेर कोरडेच असलेले खडकपूर्णा धरण मराठवाड्यात झालेल्या संततधार दमदार पावसाने अखेर तुडुंब भरले! हे धरण ओव्हर फ्लो झाले असून संत चोखासागर असे नाव असलेल्या या प्रकल्पाचे तब्बल १९ दरवाजे उघडण्यात आले आहे. यामुळे नदीकाठच्या तब्बल ३१ गाव खेड्यांना पुराचा धोका निर्माण झाला असून गावांत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ऑगस्ट अखेर हे धरण कोरडे होते आणि त्यात केवळ मृत जलसाठा शिल्लक होता. त्यामुळे सिंचन, पेयजल आणि पिकांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जालना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे.या पावसामुळे जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील भागात पाऊस पडल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली. देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा नदी ही धुथडी भरून वाहत असल्याने संत चोखा सागरात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या ९२ टक्के धरण भरले असून प्रकल्पाचे १९ दरवाजे ०.५० मीटरने उघडण्यात आले आहे. खडकपूर्णा नदीकाठच्या ३३ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच धरण क्षेत्रातीलही काही गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला. पूर नियंत्रणासाठी उपविभागीय अधिकारी सुभाष नवले, शाखा अभियंता स्मित व्यसनसुरे, पुरुषोत्तम भागिले परिस्थिती वर नजर ठेवून आहे.

आणखी वाचा- पावसाचे संकट आणखी गडद होणार!; वादळी वारा अन् विजांच्या कडकडाटासह…

या गावांत अलर्ट

आज मंगळवारी उत्तररात्री धरणाचे १९दरवाजे ०.५० मीटरने उघडण्यात आले आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येणार आहे. नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

यामध्ये टाकरखेड भागिले, निमगाव गुरू, सावंगी टेकाळे, साठेगाव, दिग्रस खुर्द, निमगाव वायाळ, हिवरखेड, राहेरी खुर्द राहेरी बुद्रुक, ताडशिवनी, देवखेड, किर्ला, दुधा, सासखेड, लिमखेडा, हनवंतखेडा, उसवद, वझर भामटे, सायखेड, डिग्रस बुद्रुक ., टाकरखेड वायाळ, तडेगाव, पिंपळगाव कुडा, लिंगा, खापरखेडा, सावरगाव तेली, वाघाळा टाकरखोपा , कानडी, देवठाणा, या गावांचा समावेश आहे. सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आणि सावध राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

आणखी वाचा-नागपूर : मंकीपॉक्स वाढतोय.. पण राज्यात आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी प्रतिबंधात्मक लस नाही…

सिंचन, पेयजलाचा प्रश्नही मिटला

अवर्षण ग्रस्त परिसरात हरित क्रांती व्हावी यासाठी संत चोखासागर प्रकल्प उभारण्यात आला आहे मात्र सिंचनाचा हित बाजूला ठेवून आजूबाजूच्या शहरांसाठी पिण्याच्या पाण्याच्या नळ योजना या ठिकाणाहून सुरू झाली आहे मात्र गेल्या वर्षी संत चोखासागर प्रकल्प मध्ये मृत साठाच होता. त्यामुळे प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी एकही आवर्तन सोडण्यात आले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला होता .मात्र यंदा सप्टेंबर मध्ये का होईना प्रकल्प तुडुंब भरला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या सिंचन बरोबरच नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील मिटणार आहे.यामुळे लाखो शेतकरी, नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्याना मोठा दिलासा मिळाला आहे.