Fake Birth Certificate In Akola अकोला : शहरातील चार हजार जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याच्या तपासात ‘बनवाबनवी’ झाल्याचा गंभीर आरोप माजी खासदार तथा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. आधार कार्ड व शपथपत्रावर वेगवेगळी जन्म तारीख असून घोटाळ्याचे उदाहरण व पुरावे म्हणून १०० लोकांच्या नावाची यादी गुरुवारी प्रशासनाकडे दिल्याचे त्यांनी सांगितले.
अकोला जिल्ह्यातही बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. या प्रकरणात ते सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. किरीट सोमय्या यांनी गुरुवारी रामदास पेठ पोलीस ठाणे गाठून पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केली.
त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही माहिती सादर करून घोटाळ्यातील १०० लोकांची यादी दिली. त्यांनी अधिकाऱ्यांकडून प्रकरणाच्या तपासाची स्थिती जाणून घेतली. यावेळी भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, महानगराध्यक्ष जयंत मसने, माजी महापौर विजय अग्रवाल आदी उपस्थित होते.
अकोला शहर व तहसील अंतर्गत जन्म प्रमाणपत्राचा मोठा घोटाळा झाला. तक्रार केल्यानंतर तहसीलदार, जिल्हाधिकारी तसेच रामदास पेठ पोलिसांनी एक किरकोळ गुन्हा दाखल केला. पोलिसांनी केवळ १२ लोकांवरच गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास केवळ १२ जणांपुरतेच मर्यादित ठेवला. अकोला शहरातील जन्म प्रमाणपत्र घोटाळा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या घोटाळ्यापैकी एक आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले.
अकोला तहसील कार्यालयात चार हजार ८४९ अर्ज आले होते. त्यातील २४ अर्ज फेटाळण्यात आले. तीन हजार ९५३ लोकांना जन्म प्रमाणपत्राचे आदेश दिले गेले. सातत्यपूर्ण पाठपुरावा व पुरावे देऊनही इतर अर्जदारांनी दिलेल्या बनावटी कागदपत्रांची चौकशी पोलीस व महसूल अधिकाऱ्यांनी केली नाही, असा आरोप सोमय्या यांनी केला.
जन्म प्रमाणपत्रासाठी दिलेल्या अर्जासोबत आधार कार्डच्या पुराव्यामधील जन्मतारीख आणि अर्जदाराने शपथपत्रात लिहिलेली जन्मतारीख वेगळीच असणाऱ्या अर्जदारांची उदाहरणे आज दिली. पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करणे थांबवावे.
या सगळ्या अपात्र, घुसखोर अर्जदार व त्यांचे समर्थन करणाऱ्या दलाल व अधिकाऱ्यांवर कारवाई केलीच पाहिजे, या प्रकरणात विशेष तपासणी पथक गठित करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व पोलीस अधीक्षकांना पत्र दिले.