भंडारा : जिल्ह्यात सध्या सर्वदूर पाऊस आहे. एकीकडे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे रस्त्यावरून चालणे तारेवरची कसरत ठरत असताना दुसरीकडे ‘लालपरी’तूनही भिजतच प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. एसटी महामंडळाच्या गळणाऱ्या बसमधून प्रवाशांना चक्क छत्रीचा आधार घेत प्रवास करावा लागल्याचा धक्कादायक आणि क्लेशदायक प्रकार भंडारा जिल्ह्यातील तुमसर आगारातून समोर आला आहे.
तुमसर आगाराची तुमसर कडून गोंदियाकडे जाणाऱ्या लाल परी’ ला गळती लागली आणि बसमध्ये प्रवाशांना छत्री उघडून बसण्याची वेळ आली. या प्रवासाचा व्हिडिओही आता समोर आला आहे. त्यामुळे प्रवाशांना बाकी सुविधा नसतील तरी चालेल कमीत कमी न गळणाऱ्या बस तरी उपलब्ध करून द्याव्यात अशी माफक अपेक्षा प्रवासी करत आहेत.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. मुसळधारांमुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे. त्यातच कामासाठी एका गावाहून दुसऱ्या गावी जाणाऱ्यांची दुहेरी तारांबळ उडाली. गळक्या बसेसमुळे प्रवाशांना आता चक्क डोक्यावर छत्री धरून प्रवास करण्याची नामुष्की ओढवली आहे.
एसटीच्या (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ) भंगार बसेसमधून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. बसेस जुन्या झाल्यामुळे आणि त्यांची योग्य देखभाल न केल्यामुळे, त्या धोकादायक स्थितीत रस्त्यावर धावत आहेत. अशा बसेसमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन कराव्या लागत आहे. कधी प्रवाशांना बसला ‘दे धक्का’ करत प्रवास करावा लागतो तर कधी इंजिन बिघाड झाल्यामुळे रस्त्यातच उतरावे लागते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. तुमसर आगाराची बस क्रमांक एम .एच ०७ सी ९५४४ या बसमध्ये प्रवाशांना चक्क छत्री हातात घेऊन प्रवास करावा लागला. सोमवारी झालेल्या जोरदार पावसामुळे तुमसर कडून गोंदियाच्या दिशेने जाणाऱ्या बसला पावसामुळे गळती लागली. त्यामुळे गळक्या लाल परीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. बसमध्ये एक महिला हातात छत्री घेऊन असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. काही प्रवाशांचे अंग आणि कपडेसुध्दा पाण्याने भिजले होते. या अजब घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
तुमसर कडून गोंदियाकडे जाणाऱ्या लाल परी' ला गळती लागली आणि बसमध्ये प्रवाशांना छत्री उघडून बसण्याची वेळ आली.https://t.co/2jrmCKw8Ui#Viralvideo #SOciaLmeDia pic.twitter.com/ao3Nd2svo3
— LoksattaLive (@LoksattaLive) July 11, 2025
या प्रकाराबाबत तुमसर आगाराचे डेपो मॅनेजर कन्हैया भोगे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, सदर बस तुमसरवरून चिखला या गावी विद्यार्थ्यांना घेऊन गेली आणि तिथून तुमसर बस स्थानकावर परत आली. त्यानंतर तुमसरवरून ती गोंदियाकडे जाण्यास निघाली. बस थोडीफार गळत असल्याने काही प्रवाशांनी त्याचा व्हिडिओ काढला. हा प्रकार सोमवारी घडला. मंगळवारी हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर मलाही या प्रकार माहित झाला. त्यानंतर मी बसची पाहणी केली. बुधवारी अशा थोड्याफार गळणाऱ्या बसेस दुरुस्ती साठी जमा करण्यात आल्या. आज ही बस भंडारा डेपो येथे दुरुस्तीसाठी पाठवणार आहे.
किमान न गळणाऱ्या बस उपलब्ध कराव्यात – प्रवाशांची मागणी प्रवाशांना बाकी सुविधा नसतील तर हरकत नाही. परंतु, कमीत कमी न गळणाऱ्या बस तरी प्रवासासाठी उपलब्ध व्हाव्यात एवढीच माफक अपेक्षा प्रवासांच्या वतीने करण्यात आली आहे.