नागपूर : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने आयात केलेला उमेदवार कायम ठेवला किंवा बदलला तरी भारतीय जनता पक्षाला काहीही फरक पडणार नाही. काँग्रेसने प्रथम आयात केलेला उमेदवार कुठे आहे हे बघावे. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे हे मोठ्या मताने जिंकणार आहेत, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

फडणवीस गुरुवारी सकाळी नागपुरात आले असता प्रसारमाध्यमांशी बोलत होते. उद्या विधानपरिषदेची निवडणूक होणार असून भाजपची सर्व मते बावनकुळेंना मिळणार आहेत. आमची कुठलीही मते फुटणार नाहीस. उलट काँग्रेसने त्यांची मते फुटू नये याची काळजी घेतली पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.

भाजपचे नेते आशीष शेलार यांनी मुंबईच्या महापौरांबद्दल कुठलाही अपशब्द वापरला नाही. महापौरांबद्दल आम्हाला आदर आहे. त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. शेलार हे कधीही महिलांच्या बाबतीत चुकीचे बोलणार नाहीत. सध्या ते शिवसेनेच्या विरोधात बोलत असून मुंबई महापालिकेतील घोटाळा दररोज बाहेर काढत आहे. ते आक्रमक असताना त्यांना शांत करण्यासाठी हा गुन्हा दाखल केला आहे पण आम्ही अशा गुन्ह्यांना घाबरत नाही. शेलार यांनी या संदर्भात आपली बाजू मांडली आहे, याकडे फडणवीसांनी लक्ष वेधले.

 दरम्यान, संरक्षण दलाचे प्रमुख सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अपघाताची चौकशी करण्यासाठी  तीनही सेनांची मिळून समिती तयार करण्यात आली असून ती समिती चौकशी करत आहे.

ही चौकशी होईपर्यंत कुठलीही विधाने करणे योग्य नाही. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी यावर राजकारण करण्यापेक्षा चौकशी होईपर्यंत अनूचित विधाने करू नये, असेही फडणवीस म्हणाले.