राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मत
नागपूर : त्रिपुरासारख्या घटनेचे राज्यात पडसाद उमटतात. यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होते. अशात सरकारने नुकसान होणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी एक धोरण निश्चित करायला हवे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. नाग विदर्भ चेम्बर्स ऑफ कॉमर्सच्या (एव्हीसीसीचे) व्यापाऱ्यांसोबतच्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर खासदार प्रफुल्ल पटेल, एव्हीसीसीचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया, उद्योजक बी.सी. भरतिया, हेमंत गांधी, शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे आदी उपस्थित होते.
यावेळी पवार यांनी राज्यातील सर्व मोठय़ा व्यापाऱ्यांच्या संघटनांनी एक संयुक्त संघटना तयार करावी आणि दर तीन महिन्यांनी आपल्या भागातील समस्यांवर चर्चा करावी आणि मग त्याचे समाधान शोधण्यासाठी सरकारसोबत बैठका घ्यावा, असा सल्ला दिला. कार्यक्रमाला शहरातील उद्योग, व्यापार, हॉटेल, सराफा, क्रेडाई, किराणा आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी पवार यांच्या समक्ष आपल्या समस्या मांडल्या. यावर पवार यांनी सर्व समस्यांवर पुढील काळात सरकारच्या संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे व त्यातून बहुतांश समस्या दूर होतील असा विश्वास व्यक्त केला.
खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले, विदर्भात इंडोरामासारखे मोठे उद्योग आणि मिहान पवारांचीच देण आहे. व्यापाऱ्यांना सर्वाधिक त्रास हा एमएमआरडीएकडून होत असून लोकल बॉडी टॅक्स, वॅट हे अजून संपुष्टात आले नसून यावर लवकर तोडगा निघावा असे मत एव्हीसीसीचे माजी अध्यक्ष हेमंत गांधी यांनी व्यक्त केले.अध्यक्ष मेहाडिया यांनी संस्थेच्या कार्यावर प्रकाश टाकला. संचालन रामअवतार तोतला यांनी केले. गडकरींचे कौतुक, फडणवीसांना टोला नितीन गडकरी यांना संसदेत अतिशय पोटतिडकीने जनतेच्या समस्या मांडताना मी अनेकदा पहिले आहे. विकासासाठी ते नेहमी आग्रही असतात. अशावेळी ते पक्ष बघत नाहीत. ते देशाच्या विकासाकरिता नेहमी झटत असतात, अशा शब्दात पवार यांनी गडकरींचे कौतुक केले. राज्यातील प्रत्येक भागातून महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळाला आहे. ज्या भागातून मुख्यमंत्री बनतो त्या भागाला नक्कीच फायदा होत असतो. मात्र गेली पाच वर्षे जेव्हा या भागातून मुख्यमंत्री होते तेव्हा येथील समस्या सुटायला हव्या होत्या. मात्र त्या समस्या अजूनही कायम आहेत, असा टोलाही पवार यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
