माधुरी मडावी ‘वंचित’तर्फे निवडणूक रिंगणात

नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचे आश्वासन काँग्रेसकडून मिळाल्यावर सरकारी नोकरीचा राजीनामा देणाऱ्या माधुरी मडावी यांना ऐनवेळी उमेदवारी नाकारून काँग्रेसने तोंडघशी पाडले. त्यामुळे त्या आता वंचित बहुजन आघाडीतर्फे लढणार आहेत.

अमरावती विभागाचे पुरवठा उपायुक्त रमेश मावस्कर यांना भाजपने मेळघाटमधून उमेदवारी दिली आहे. तसेच नागपुरातील बहुचर्चित मोनिका किरणापुरे हत्याकांडाचा तपास करणारे कळमन्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेश पडवी यांनाही भाजपने नंदुरबार जिल्ह्य़ातील शहादा मतदारसंघातून रिंगणात उतरवले आहे.

मडावी यांची काही दिवसांपूर्वी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील नगररचना साहाय्यक संचालकपदावर बदली करण्यात आली. तेथे रुजू झाल्यानंतर काँग्रेसमधील काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना आरमोरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे त्यांनी २७ जुलै २०१९ला आपल्या पदाचा राजीनामा दिला. आरमोरीमध्ये सध्या भाजपचे कृष्णा गजबे हे आमदार आहेत. त्यांच्याविरुद्ध मडावी उभ्या राहिल्यास त्या भाजपचा पराभव करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे मडावी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. परंतु तो तात्काळ मंजूरच करण्यात आला नाही. त्याविरुद्ध मडावी यांनी प्रथम मॅट आणि नंतर उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने मडावी यांची बाजू ऐकल्यानंतर त्यांचा राजीनामा मंजूर करण्याचे आदेश राज्याच्या नगररचना विभागाच्या प्रधान सचिवांना दिले. या आदेशामुळे मडावी यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला. पण काँग्रेसने आरमोरीतून माजी आमदार आनंद गेडाम यांची उमेदवारी घोषित केली. त्यामुळे काँग्रेसने आपली फसवणूक केली, अशी मडावी यांची भावना झाली असून त्यांनी वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीने रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. याला खुद्द मडावी यांनी दुजोरा दिला. मडावी यांना उमेदवारी नाकरण्यामागे काँग्रेसमधील पक्षांतर्गत कुरघोडी कारणीभूक ठरल्याची चर्चा आहे.

पुरवठा उपायुक्तही रिंगणात : अमरावती विभागाचे पुरवठा उपायुक्त रमेश मावस्कर यांना भाजपने मेळघाटमधून उमेदवारी दिली आहे. मावस्कर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते २००७ ते २०१० या दरम्यान नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात पुरवठा उपायुक्त म्हणून कार्यरत होते. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपकडून उमेदवारी मागितली होती. त्यासाठी त्यांनी स्वेच्छानिवृत्तीची तयारीही दर्शवली होती. पण ऐनवेळी त्यांना भाजपने नकार कळवला. या वेळी मात्र त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

‘खाकी’तून ‘खादी’मध्ये!

मोनिका किरणापुरे हत्याकांडातील मुख्य आरोपीला पकडणारे पोलीस अधिकारी राजेश पडवी यांना भाजपने नंदुरबार जिल्ह्य़ातील शहादा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. सध्या ते मुंबईतील अंधेरी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकपदावर कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते अनुसूचित जमातीसाठी आरक्षित शहादा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. खाकी वर्दीतून आता ते खादीच्या दुसऱ्या भूमिकेत दिसणार आहेत.

काँग्रेसचे काही पदाधिकारी भाजपच्या दावणीला बांधले आहेत. ते पक्षात राहून भाजपला लाभ कसा पोहोचेल, यासाठी प्रयत्न करीत आहेत. मला उमेदवारी मिळू नये म्हणून छाननी समितीतील विदर्भातील एका नेत्याने प्रयत्न केले.

– माधुरी मडावी