महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (महाज्योती)  तेलप्रक्रिया उद्योग (ऑईल प्रोसेसिंग प्लॉन्ट) सुरू करून उद्योजक बनू पाहत आहे. हा संस्थेच्या मूळ उद्देशाला फाटा देण्याचा प्रकार आहे, अशी टीका झाल्यानंतर महाज्योतीच्या संचालक मंडळाने करडई तेलाचा कारखाना उभारण्याचा निर्णय एकमताने रद्द केला आहे. 

महाज्योतीच्या संचालक मंडळाची बैठक सोमवारी झाली. या बैठकीत स्वत: महाज्योतीचे अध्यक्ष मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कारखाना उभारण्याचा निर्णय मागे घेण्याचा प्रस्ताव सादर केला आणि तो सर्वानुमते संमत करण्यात आला. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग या वंचित घटकांच्या विकासाकरिता महाज्योतीची स्थापना करण्यात आली. या संस्थेने चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथे ऑईल प्रोसेसिंग प्लॉन्ट टाकण्यासाठी १५ डिसेंबर २०२१ ला जाहिरात  प्रकाशित केली होती.

त्यानंतर काही उद्योजक कंपन्यांचे सादरीकरण देखील झाले. पण, ही जाहिरात येताच महाज्योती विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, संशोधन करण्यासाठी मदत करण्याऐवजी कारखानदारी करीत आहे,  याकडे ‘लोकसत्ता’ने लक्ष वेधले होते. या वृत्तानंतर महाज्योतीवर सर्व स्तरातून टीका झाली. यूपीएससी, एमपीएससीची तयारी करणारे दिल्ली, पुणे येथील विद्यार्थी तसेच पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाज्योती उद्देशापासून भरकटत असल्याचा आरोप केला. मात्र, महाज्योतीच्या संचालक मंडळाने आपल्या निर्णयाचे समर्थन करण्याचा प्रयत्न  केला. परंतु विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याचे पडसाद उमटण्याचे संकेत मिळताच तेल कारखाना काढण्याची योजना गुंडाळण्यात आली.

तत्पूर्वी महाज्योतीने नॉन क्रिमिलेयर गटातील शेतकऱ्यांकरिता करडई तेलबिया उत्पादन व प्रक्रिया प्रकल्प चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला वाशीम व बुलढाणा जिल्ह्यातील ३ क्लस्टरद्वारे राबवण्यास सुरुवात केली. करडई पीक घेण्याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि कृषी खात्याच्या मदतीने मार्गदर्शन, प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले.

या सात जिल्ह्यांतील ६,९४९ शेतकऱ्यांना ६४६४.४५ हेक्टर क्षेत्राकरिता प्रति एकर ४ किलोप्रमाणे एकूण ६४६.६० क्विंटल बियाणे मोफत वाटण्यात आले. करडईचे उत्पादन आल्यानंतर महाज्योती ते खरेदी करणार होते. त्यापासून तेल काढायचे होते. महाज्योतीला करडई तेलाचा ब्राँड तयार करायचा होता. तो तेल विकल्यानंतर मिळालेल्या उत्पन्नातून काही रक्कम शेतकऱ्यांना देऊन उर्वरित रक्कम महाज्योतीला प्राप्त होणार होती. परंतु नव्या निर्णयानंतर महाज्योती शेतकऱ्यांकडून करडई खरेदी करणार नाही. शेतकऱ्यांना ती खुल्या बाजारात विकावी लागणार आहे, अशी माहिती महाज्योतीकडून प्राप्त झाली आहे.

करडईचे तेल काढण्यावरून टीका आणि आरोप-प्रत्यारोप होत होते. यामुळे नाहक महाज्योती बदनाम होत होती. म्हणून तेल कारखाना काढण्याचा निर्णय मागे घेण्यात आला.                                                 – डॉ. बबनराव तायवाडे, संचालक, महाज्योती.