नागपूर : परिवहन खात्याने उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसवण्यासाठी तिसऱ्यांदा १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली. परंतु नवीन मुदतीचा विचार केल्यास रोज ३ लाख १६ हजार ७१ वाहनांना पाटी बसवावी लागणार आहे. सध्या बऱ्याच केंद्रांवर पाटीसाठी दीड ते दोन महिन्यांची प्रतीक्षायादी आहे. त्यामुळे दिलेल्या मुदतीत पाट्या लागणार कशा, हा प्रश्न आहे.
केंद्र सरकारने २०१९ पूर्वीच्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसवण्याची सक्ती केली आहे. परंतु, वाहनधारकांचा प्रतिसाद अल्प आहे. २० जून २०२५ पर्यंत केवळ २३ लाख वाहनांनाच अशी पाटी लावण्यात आली. २०१९ पूर्वीची विविध संवर्गातील सुमारे २ कोटी वाहने आहेत. नवीन मुदतीनुसार पाटी लावण्यासाठी आता ५६ दिवसच शिल्लक आहेत. त्यामुळे केंद्रात भेटीची वेळ निश्चित केलेल्यांसह शिल्लक असलेल्या एकूण १ कोटी ७७ लक्ष वाहनांमधून रोज ३ लाख १६ हजार ७१ वाहनांना पाटी लावावी लागणार आहे. सुमारे ४० लाख वाहन धारकांनी या पाटीसाठी जवळच्या केंद्रात भेटीची तारीख व वेळ निश्चित केली आहे. दरम्यान, नागपूरसह राज्यातील अनेक ठिकाणी दीड ते दोन महिन्यापर्यंतची प्रतीक्षा यादी आहे. सध्याची प्रतीक्षायादी बघता ही फारच आव्हानात्मक बाब आहे.
परिवहन खात्याचे म्हणणे काय ?
“राज्यात २ कोटी वाहनांपैकी २३ लाख वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी लागली असून ४० लाख वाहनधारकांनी पाटी लावण्यासाठी भेटीची वेळ निश्चित केली आहे. शिल्लक वाहनांनी लवकर पाटी लावावी. मुदत संपल्यानंतर वाहनांवर कारवाई केली जाईल.” – शैलेश कामत, सहपरिवहन आयुक्त (संगणक), मुंबई.
एचएसआरपी म्हणजे काय?
एचएसआरपी किंवा हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स (High Security Registration Plate) ही अॅल्युमिनियमपासून बनवलेली नंबर प्लेट आहे. या नंबर प्लेटच्या डाव्या कोपऱ्यात एक यूनिक लेसर ब्रँडेड १० अंकी पिन दिलेला असतो. ही पाटी ॲल्युमिनियमपासून बनवलेली असून १.१ मिमी एवढा तिचा आकार असतो. तसेच त्या नंबर प्लेटवर एक होलोग्राम जोडण्यात आला असून तो क्रोमियम आधारित आहे. स्टिकरप्रमाणे दिसणाऱ्या होलोग्राममध्ये वाहनांचा सर्व तपशील ऑनलाइन नोंद होतो.
सर्वात महत्वाचं म्हणजे ही नंबर प्लेट बनावट पद्धतीने बनवता येत नाही. तसेच भारत सरकारने एप्रिल २०१९ नंतर विकल्या गेलेल्या प्रत्येक वाहनावर एचएसआरपी वापरणे अनिवार्य केलं आहे. तसेच रस्ते आणि वाहनांच्या संबंधित गुन्ह्यांमध्ये घट करण्याच्या दिशेने हा महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, ३१ मार्चच्या आधी गाडीला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स बसवून घ्यावी लागणार आहेत.