Maharashtra Assembly Winter Session : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. आज पहिल्याच दिवशी सीमावादाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक-आमने सामने आल्याचे दिसून आले. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सीमावादाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांना उत्तर दिलं. तर महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या आंदोलनास कर्नाटक सरकारने परवानगी नाकारल्याचेही समोर आले आहे. यावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्यावर आज महाराष्ट्र एकीकरण समितीने एका आंदोलनाचे अयोजन केले होते. लोकशाही मार्गाने आंदोलन होते परंतु कर्नाटक सरकारने त्यासाठी परवानगी दिली नाही. आपल्या इथूनही काही नेते तिथे जाऊ इच्छित होते, त्यांनाही परवानगी दिली गेली नाही. तर आम्ही नक्कीच याबाबत कर्नाटकच्या सरकारशी चर्चा करू. कारण, दोन्ही राज्यांनी हे ठरवलं आहे की येण्याजाण्यावर काही प्रतिबंध नाही आणि जर शांततेच्या मार्गाने आंदोलन होत असेल, तर त्याला रोखण्याचंही काही कारण नाही.”

याचबरोबर “सीमावासीयांच्या पाठीशी महाराष्ट्राचं सरकार पूर्णपणे उभं आहे. त्यांच्यावर कुठलाही अन्याय होऊ नये, अशी आमची भूमिका असणार आहे. या संदर्भात आज लोकतांत्रिक पद्धतीने आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्याला परवानगी नाकारण्यात आली, त्याही संदर्भातील चर्चा आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी करू. कुठल्याही परिस्थितीत सीमाभागाच्या संदर्भातील राज्याची जी भूमिका आहे, ही तसूभरही मागे जाणार नाही.” असंही यावेळी फडणवीसांनी स्पष्ट केलं.

याशिवाय, “आपल्याला कल्पना आहे की कालच मुख्यमंत्र्यांनी जतच्या ४२ गावांच्या पाणी प्रश्नाच्या संदर्भातही निर्णय केला आणि दोन हजार कोटी रुपये हे त्यासाठी दिलेले आहेत. सीमाप्रश्न असो किंवा राज्यातील सीमाभाग असो, या दोन्हींच्या संदर्भात राज्यसरकार पूर्णपणे गंभीर आहे.” असंही फडणवीस म्हणाले.

“कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर हे सांगितलं, की काही विवीक्षित ट्वीट्स की जे मोठ्याप्रमाणात एकप्रकारे असंतोष तयार करणारे होते. ते ट्वीट माझे नाहीत, हे चुकीचं हॅण्डल आहे. आम्ही त्यावर कारवाई करतो असं सांगितलेलं आहे. आम्ही नक्कीच माहिती घेऊ की त्यावर काय कारवाई झाली.” अशी माहिती फडणवीसांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra karnataka border dispute in any case the role of the state in relation to the border area will not change fadnavis msr