नागपूरः सातारातील फलटण येथील उपजिल्हारुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली. त्यापूर्वी तिने स्वत:च्या तळहातावर आत्महत्येमागील कारण नमुद केलेले आढळले. या प्रकरणात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत एक पोलीस उपनिरीक्षकासह दोघांवर गुन्हा दाखल केला गेला. या घटनेचा संताप राज्यभरात पसरला असून नागपुरातील मेडिकल, मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात डॉक्टरांनी कसा निषेध नोंदवला, याबाबत आपण जाणून घेऊ या.
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेविरोधात निवासी डॉक्टरांची सेंट्रल मार्डतर्फे शनिवारी राज्यभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत ‘ब्लॅक रिबन’ आंदोलन केले जात आहे. आंदोलनात नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) या दोन्ही रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी काळी फित बांधून सहभाग नोंदवला. डॉक्टरांनी काळी फित बांधून आपल्या नियमित सेवा देणे सुरू केले आहे. शांततेने सातारातील घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे.
शासकीय रुग्णालयांत दिवसभर रुग्णसेवा मात्र सुरळीत सुरू ठेवणार असल्याचे डॉक्टरांचे म्हणने आहे. या आंदोलनातून डॉक्टरांनी आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधले आणि मृत वैद्यकीय अधिकाऱ्याला श्रद्धांजली वाहिली. सेंट्रल मार्डने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मृत्यूने आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. आरोपींना तात्काळ अटक करून या प्रकरणाची सीआयडीमार्फत सखोल चौकशी करावी”. सेंट्रल मार्डने इशारा दिला आहे की, जर शासनाने तातडीने कारवाई केली नाही, तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत ठोस धोरण आखणे आणि आरोपींवर कठोर कारवाई करणे, हीच या आंदोलनाची मुख्य मागणी असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
डॉक्टर सुरक्षा कायद्याबाबत म्हणाले…
सेंट्रल मार्ड संघटनेने पुढे स्पष्ट केले की, आरोग्य सेवकांना सुरक्षित आणि सन्मानजनक कामाचे वातावरण मिळणे हा मूलभूत अधिकार आहे. डॉक्टरांवर होणारे हल्ले, दबाव आणि असुरक्षितता यामुळे वैद्यकीय सेवा प्रभावित होते. अशा घटना टाळण्यासाठी शासनाने डॉक्टर्स प्रोटेक्शन ॲक्ट प्रभावीपणे लागू करावा, अशी मागणीही सेंट्रल मार्डने केली आहे. राज्यभरातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमधील निवासी डॉक्टरांनी एकजुटीने काळी फित बांधून ‘सेवा देणाऱ्यांना वाचवा’ असा संदेश दिला. नागपूरमधील मेडिकल आणि मेयो हॉस्पिटलमध्येही डॉक्टरांनी सकाळपासून रुग्णसेवेबरोबरच आपला निषेध नोंदवला.
