नागपूर : भाजपा नेत्या सना खान हत्याकांडात अमित साहूच्या मोलकरनीचा जबाब घेतल्यानंतर मोठी घडामोड समोर आली आहे. मोलकरनीने अमितच्या घरात रक्ताच्या थारोळ्यात सना खान यांचा मृतदेह बघितला आणि थेट घरी पळ काढला होता. सना यांचा खून झाल्याचा ठोस पुरावा आणि साक्षिदार पोलिसांच्या हाती लागला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्यांक सेलच्या पदाधिकारी सना खान आणि जबलपूरचा कुख्यात गुन्हेगार अमित साहू यांचे प्रेमसंबंध होते. कुटुंबियांचा विरोध झुगारून सना आणि अमित यांनी लग्न केले होते. मात्र, अमित शाहू याला सना खान यांच्या राजकीय कारकिर्दीच्या बळावर राजकारणात प्रवेश करायचा होता. त्यामुळे अमितने सना यांना काही राजकीय नेत्यांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. काही जणांसोबत शारीरिक संबंधाच्या चित्रफिती बनवल्या. त्या चित्रफिती प्रसारित करून राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याची धमकी देऊन अनेकांकडून लाखो रुपयांमध्ये खंडणी घेतली. सना खान यांचा अमितने २ ऑगस्टला जबलपूरमधील घरी डोक्यात सळाख घालून खून केला होता. सनाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी नोकर जितेंद्र गौड धर्मेंद्र यादव, राकेश सिंह, कमलेश पटेल आणि रब्बू ऊर्फ रविकिशन यादव यांना बोलवायला गेला. दरम्यान, घरकाम करण्यासाठी मोलकरीन अमितच्या घरी आली. दरवाजा उघडला असता तिला सना यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात दिसला. सना यांचा मृतदेह बघताच ती घाबरली. तिने लगेच घराकडे पळ काढला आणि त्या दिवसापासून ती पुन्हा अमितच्या घरी आलीच नाही. नागपूर पोलिसांना तपासात मोलकरनीचा धागा गवसला. त्यांनी मोलकरनीचा शोध घेतला आणि तिच्याशी चर्चा केली. तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तिचा जबाब नोंदविला असून ती हत्याकांडाची एकमेव साक्षिदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा – अमरावती विद्यापीठातील तीन संशोधकांना स्‍टॅनफोर्ड विद्यापीठाच्‍या प्रभावशाली शास्‍त्रज्ञांच्या यादीत स्‍थान

अमितच्या अडचणीत वाढ

अमित साहूने पद्धतशीरपणे कट रचून सना यांचा खून केला आणि मृतदेहाची विल्हेवाटही लावली. हत्याकांडाचे कुणाही प्रत्यक्ष साक्षिदार नसल्याची खात्री पटल्याने पाचही आरोपी पोलीस कोठडीत बिनधास्त होते. आरोपी वारंवार पोलिसांची दिशाभूल करीत गुंगारा देत होते. मात्र, पोलिसांच्या हाती प्रत्यक्ष साक्षिदार लागल्यामुळे अमितच्या अडचणीत वाढ झाली आहे.

हेही वाचा – अमरावती : छायाचित्र प्रसारित करण्‍याची धमकी देत खंडणी उकळण्‍याचा महिलेचा प्रयत्‍न

मृतदेह अद्यापही गवसला नाही

हिरण नदीत सना यांचा मृतदेह फेकल्याची बनवाबनवी करणाऱ्या अमित साहूने अन्य कुठेतरी मृतदेहाची विल्हेवाट लावली आहे. हिरण नदी आणि नर्मदा नदीच्या संपूर्ण पात्रात पोलिसांनी शोध घेतल्यानंतरही सना यांचा मृतदेह मिळाला नाही. सोमवारी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त मुमक्का सुदर्शन आणि पोलीस उपायुक्त राहुल मदने हे मानकापूरच्या दोन पथकासह जबलपूरला गेले होते. दोन्ही अधिकाऱ्यांना हत्याकांडाबाबत ठोस पुरावे मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maid saw the bloodied body bjp leader sana khan murder case adk 83 ssb