देवेश गोंडाणे
नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ चे शुद्धिपत्रक जाहीर करून त्यामध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी (एसईबीसी) आरक्षण लागू केले आहे. २९ डिसेंबर २०२३च्या जाहिरातीमध्ये २५० जागांची वाढ करत सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मराठा उमेदवारांना आता मागासवर्गीयांकरिता लागू असलेल्या वयोमर्यादेतील सवलतींचा लाभ घेऊन वयोमर्यादा ओलांडली असतानाही नव्याने अर्ज करता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणूक आणि मराठा समाजाच्या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने फेब्रुवारी २०२४मध्ये मराठा आरक्षणाचा कायदा केला. परंतु, आरक्षण लागू होण्याआधी ‘एमपीएससी’च्या अनेक जाहिराती प्रसिद्ध झाल्या असून विविध विभागांच्या परीक्षा प्रलंबित आहेत. आता या सर्व जाहिरातींमध्ये ‘एसईबीसी’ आरक्षण लागू करून शुद्धिपत्रक काढण्यात येणार आहे. त्यामुळेच एमपीएससीने २८ एप्रिलची ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४’, तसेच १९ मे रोजी होणाऱ्या ‘समाज कल्याण अधिकारी गट ब’, ‘इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब’ या परीक्षा पुढे ढकलल्या. बुधवारी आयोगाने नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचेही शुद्धिपत्रक जाहीर करून त्यामध्ये २५० जागांची वाढ केली आहे.यात ‘एसईबीसी’ म्हणजेच मराठा आरक्षण लागू करण्यात आले आहे. त्याशिवाय या आरक्षणाच्या लाभार्थींसाठी अनेक सुविधाही जाहीर केल्या आहेत.

हेही वाचा >>>दामदुप्पटीचे आमिष! ‘बंटी-बबली’ने केली तब्बल साडेपाच कोटींनी फसवणूक

नव्याने अर्ज करण्याची संधि

●जाहिरातीस अनुसरून अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतून अर्ज केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे.

●त्यासाठी ‘एमपीएससी’च्या अधिकृत संकेतस्थळावर लिंक देण्यात आली आहे. त्यावर नव्याने अर्ज करायचा आहे. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा दावा केल्यास संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जातील दावा रद्द समजण्यात येणार आहे.

●सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षण लागू झाल्याने आता अशा उमेदवारांना मागासवर्गीयांकरिता लागू असलेल्या वयोमर्यादेतील सवलतींचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे वयोमर्यादेची अट ओलांडलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज करता येणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha reservation implemented in mpsc recruitment revised advertisement released by increasing 250 seats amy