अमरावती: सध्‍या सुरू असलेल्‍या मराठा आरक्षण आंदोलनाच्‍या पार्श्‍वभूमीवर जिल्‍ह्यातील ‘अजात’ समुदायाचा इतिहास चर्चेत आला आहे. जन्‍म, मृत्‍यू, शाळा, शेती अशा कोणत्‍याच दाखल्‍यावर ज्‍यांच्‍या जातीचा उल्‍लेख नाही, असा मंगरूळ दस्‍तगीर गावातील एक समुदाय ‘अजात’ नावाने ओळखला जातो. या ‘अजात’ समुदायाच्‍या वाट्याला मात्र जातीच्‍या नावावर संघर्षच आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विदर्भात वर्ण व्‍यवस्‍थेतील जातींचे बुरूज उभे असताना स्‍वातंत्र्यपूर्व काळात मंगरूळ दस्‍तगीर येथील गणपती ऊर्फ हरी महाराज यांनी जातिअंताची चळवळ उभी केली. कीर्तन-प्रवचन करत भ्रमंती करत असताना गणपती महाराजांना जातव्यवस्थेचे विद्रूप रूप आणि अनिष्ट प्रथा दिसून आल्या. याच दरम्यान त्यांनी जातीपाती मोडण्याचा संकल्प केला आणि क्रांतिकारी कार्यास सुरुवात केली.

हेही वाचा… नोव्हेंबर महिन्यात थंडी कमी राहण्याची शक्यता; भारतीय हवामान खात्याचा अंदाज

१९१५ ते १९३५ या दोन दशकांत जात मोडण्‍याची ही मोहीम चालली. जाती-पाती मोडून माणूस म्हणून जगण्याचा संदेश गणपती महाराजांनी दिला. त्‍यांनी पन्नास हजारांहून अधिक अनुयायांना जात सोडायला लावून ‘अजात’ केले. मात्र, हे क्रांतिकारी पाऊल सहजसोपे नव्हते. त्यांच्‍यावर जीवघेणे हल्ले झाले. त्‍यांना बहिष्कृत करण्‍यात आले, कोर्ट-कचेऱ्यांच्या फेऱ्या माराव्या लागल्या. मात्र, ते डगमगले नाहीत. पुढे १९४० पर्यंत ते जातीभेद मोडून काढण्यासाठी कार्यरत राहिले.

हेही वाचा… अभियंता भामकर बंधूंची खादी वस्त्र प्रावरणात भरारी

अनिष्ट रुढींना विरोध करतानाच गणपती महाराजांनी मुळावरच घाव घातला. आपल्या अनुयायांना जाती सोडायला सांगितल्या. यासाठी त्यांनी काही कार्यक्रमांची सुरुवात केली. लोकांना जाती बाजूला सारून एक व्हायला लावण्यासाठी गणपती महाराजांनी सामूहिक भोजनाची नवी पद्धत शोधून काढली. ‘अन्नकाला’ असे त्याला नाव दिले.

हेही वाचा… मराठा आरक्षण आंदोलन: नागपूरमधील ‘एसटी’ची तीन हजार किलोमीटरची वाहतूक रद्द

मंगरूळ दस्तगीरमध्ये १९२९ मध्‍ये ‘व-हाड – मध्य प्रांत बहिष्कृत परिषद’ आयोजित करण्‍यात आली होती. त्यावेळी गणपती महाराज प्रमुख पाहुणे होते. परिषदेच्‍या समारोपाला त्‍यांनी उभारलेल्‍या विठ्ठल मंदिरात अस्‍पृश्‍यांना प्रवेश दिला. हे एक क्रांतीकारी पाऊल मानले गेले होते. अजात परंपरा मानणाऱ्या आणि गणपती महाराजांनी सांगितलेला संदेश पाळणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली असली, तरी आजही अनेक कुटुंब त्‍यांचा विचार चिकाटीने पुढे नेत आहेत. पण, या ‘अजात’ समुदायातील नवीन पिढीला शिक्षण, नोकरीसाठी जात शोधण्‍यासाठी धडपड करावी लागत आहे. निवडणूक असो किंवा नोकरी, जात प्रमाणपत्र आवश्‍यक असते. ते मिळवण्‍यासाठी अनेक तरूणांना कोतवाल बुकापासून अनेक दस्‍तावेज शोधून काढावे लागत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha reservation protest what is the ajat non caste community mma 73 dvr