नागपूर : कोशनिर्मिती हे काहीसे क्लिष्ट काम. ती एकट्याने नाही तर समूहाने करण्याची गोष्ट. पण समूहात मतभेदांची शक्यताच अधिक असल्याने त्यातून कोशनिर्मितीचे काम पूर्णत्वास जात नाही. त्यामुळे पक्षी, प्राणी, वृक्ष आणि मत्स्यकोशनिर्मितीचे काम अरण्यऋषी आणि पद्माश्रीने सन्मानित दिवंगत मारुती चितमपल्ली यांनी एकट्याने केले. त्यांनी ‘लोकसत्ता’जवळ या कोशनिर्मितीची कथा सांगितली होती. त्यांचा ‘प्राणीकोश’ आता प्रकाशनाच्या वाटेवर असून साहित्य प्रसार केंद्राने ही जबाबदारी घेतली आहे.

अर्ध्याहून अधिक आयुष्य जंगलात घालवलेल्या दिवंगत मारुती चितमपल्ली यांचा ‘पक्षीकोश’ नऊ ते दहा वर्षांपूर्वी प्रकाशित झाला. या पक्षीकोशाच्या निर्मितीला त्यांना तब्बल बारा वर्षे लागली. आता येऊ घातलेल्या ‘प्राणीकोश’साठीही सहा वर्षे लागली. ‘पक्षीकोशा’त तब्बल २० हजार नवीन शब्द आहेत. विविध भाषांमधील पक्ष्यांची नामावलीच नाही तर पक्ष्यांचे आयुष्य त्यांनी या कोशात मांडले आहे.

प्राणीकोशाची रचनाही जवळजवळ पक्षीकोशासारखीच आहे. भारतातील ४५० प्रकारच्या प्राण्यांचा या कोशात समावेश आहे. मराठी, संस्कृत, पाली, प्राकृत या जुन्या भाषा आणि तेलगू, तामीळ, कानडी, मल्याळम, गुजराती या भाषांमधील संबंधित प्राण्यांची नावे त्यांनी यात समाविष्ट केली आहेत.

अनमोल ठेवा

५ नोव्हेंबर हा चितमपल्ली यांचा जन्मदिन.वनमहर्षी, अरण्यऋषी ही लोकांनी दिलेली पदवी. पद्माश्रीने सन्मानित मारुती चितमपल्ली यांचे वयाच्या ९३व्या वर्षी १७ जून २०२५ ला निधन झाले. चार दशकांच्या जंगलातील नोंदीचा प्रवास त्यांच्या अनेक पुस्तकांद्वारे वाचकांसमोर आला. तर जिज्ञासू आणि अभ्यासू व्यक्तींसाठी पक्षीकोश व प्राणीकोश म्हणजे एक अनमोल ठेवा ठरणार आहे.

पक्षीकोश प्रकाशित झाला, प्राणीकोशही प्रकाशनाच्या वाटेवर आहे. मत्स्यकोश आणि वृक्षकोशचे काम बऱ्याच प्रमाणात झाले असले तरी ते अपूर्णच राहिले. या चारही कोशांचे काम त्यांनी साहित्य प्रसार केंद्राला सोपवले होते. प्राणीकोशचे काम ९० टक्के पूर्ण झाल्यामुळे त्याच्या प्रकाशनाची वाट मोकळी झाली. दीड ते दोन महिन्यांत तो अभ्यासकांसमोर येईल. – मकरंद कुळकर्णी, साहित्य प्रसार केंद्र