बुलढाणा : जळगाव जामोद येथील रहिवासी, भाजप कार्यकर्ते व कंत्राटदार पंकज देशमुख यांच्या संशयास्पद मृत्यूची सीआयडी चौकशी करावी या मागणीसाठी शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या जळगाव शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्य मार्गासह अंतर्गत रस्त्यावरील दुकानें, व्यापारी प्रतिष्ठान दुपारी दोन वाजेपर्यंत बंद होती

सत्ताधारी भाजप शिवसेना ( शिंदे गट ) सह विविध विरोधी पक्षीय नेत्यांचा समावेश असलेल्या न्याय हक्क जन आंदोलन समितीच्या वतीने शुक्रवारी, जळगाव शहर बंदचे आवाहन केले होते. लघु व्यावसायिक व्यापारी, नागरिक यांची होणारी गैरसोय लक्षात घेता संघर्ष समितीने दुपारी २ वाजे पर्यंतच बंद पाळण्याचा निर्णय घेतला होता. सकाळ पासून ते दुपारी २ वाजेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, चौधारा, भाजीपाला मार्केट, आदि मुख्य भागासह आतील रस्त्यावरील दुकानें बंद होती. औषधी, डेअरी, रुग्णालये यांना बंद मधून सूट देण्यात आली होती.

बंद मध्ये प्रसेनजित पाटील, स्वाती वाकेकर, अभय मारोडे, मनोज वाघ, अजय देशमुख, सैय्यद नफिज, इरफान खान, भाऊ भोजने, भीमराव पाटील, विश्वास पाटील, भाऊराव भालेराव, अर्जुन घोलप, ऍड अमर पाचपोर, ऍड संदीप मानकर, तुकाराम काळपांडे, अजय पारस्कार, या काँग्रेस, राष्टवादी, शिवसेना ( ठाकरे व शिंदे गट ), समाजवादी पार्टी, वंचित आघाडी पक्ष व सामाजिक संघटनाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. मागील ३ मे रोजी देशमुख यांचा मृतदेह शेतात आढळून आला होता. पोलिसांनी आत्महत्या म्हणून नोंद केली. मात्र पत्नी सुनीता देशमुख यांचेसह समितीने हा घात पाताचा प्रकार असल्याचा आरोप करुन सीआयडी चौकशीची मागणी केली. मागील दीड महिन्यात विविध आंदोलने करण्यात आली. याच टप्प्यात आज जळगाव बंद पुकारण्यात आला.

नावे दिली, कारवाई का नाही ?

दरम्यान मृतकंच्या पत्नी सुनीता पंकज देशमुख यांनी संशयीतांची नावे पोलिसांना दिली. पण संशयीत आरोपीवर कार्रवाई का होत नाही? असा सवाल जन आंदोलन समितीने आज केला आहे.