विधानसभा निवडणुकीत नागपूर शहरालगतच्या हिंगणा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार समीर मेघे यांच्या विरुद्ध भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये आलेले मोजी आमदार विजय घोडमारे यांच्यात थेट सामना रंगणार आहे. वंचित बहुजन आघाडी आणि बसपासह एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत.

मात्र प्रचाराच्या अंतिम टप्प्यात येथे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होण्याचे संकेत  मिळत आहेत. हिंगणा हा तसा काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला, मात्र २००९ मध्ये येथे प्रथमच विजय घोडमारे यांच्या रूपाने भाजपचे कमळ फुलले. तेव्हा त्यांनी राष्ट्रवादीचे नेते रमेश बंग यांचा पराभव केला होता. बंग केवळ ८०० मतांनी पराभूत झाले. त्यावेळी राष्ट्रवादीतील अंतर्गत विरोधाचा फटका बंग यांना बसला होता. २०१४ च्या निवडणुकीत घोडमारे यांच्याऐवजी भाजपने समीर मेघे यांना उमेदवारी दिली. घोडमारे त्यांच्यासोबत होते. त्यामुळे भाजपने ही जागा राखली. मेघे प्रथमच विजयी झाले. पाच वर्षांत त्यांनी मतदारसंघात विविध विकास कामांचा सपाटा लावला. जलयुक्त शिवारचे कार्यक्रम राबवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेले फेटरी हे गाव त्यांच्याच मतदारसंघात आहे. त्यामुळे त्यांची मुख्यमंत्र्यांशी जवळीक आहे. शैक्षणिक संस्थांचे जाळे त्यातून होणारा लोकसंपर्क आणि पक्षाचे भक्कम पाठबळ या त्यांच्या भक्कम बाजू आहेत. दुसरीकडे जुन्या कार्यकर्त्यांपासून दुरावणे, ग्रामीण भागाशी नाळ तुटणे, वाडी पालिकेच्या राजकारणात एका गटापासून दुरावणे यामुळे त्यांच्याविषयी पक्षातच नाराजीचेही सूर उमटू लागले आहेत. वाडी पालिकेच्या नगराध्यक्ष हटाव प्रकरणाचा फटका मेघे यांना बसू शकतो. शिवाय शिवसेना कोणती भूमिका घेते हे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.

दुसरीकडे घोडमारे हे मूळचे भाजप कार्यकर्ते असल्याने त्यांची गावोगावी संपर्क यंत्रणा आहे. त्याला आता राष्ट्रवादीचे बळ मिळाले आहे. या भागाचे माजी आमदार रमेश बंग आणि काँग्रेसचे नेतेही घोडमारेंसोबत फिरत आहेत. मात्र वाढते वयोमान, पक्ष सत्तेत नसल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये व नेत्यांमध्ये आलेला निरुत्साह या बाबी त्यांच्यासाठी अडचणीच्या आहेत. तरी घोडमारे पूर्ण क्षमतेने रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बुटीबोरीतील सभेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. दुसरीकडे  मेघे यांच्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रचार सभा घेऊन कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. संपूर्ण मेघे कुटुंब प्रचारात आहेत.

या मतदारसंघातील वानाडोंगरी, निलडोह, डिगडोह या भागात भाजपचे प्राबल्य आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजप व सेना तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी स्वतंत्र निवडणूक लढले होते. भाजपचे समीर मेघे यांना ८४,१३९, राष्ट्रवादीचे रमेश बंग यांना ६०,९८१ तर काँग्रेसच्या कुंदा राऊत यांना २०,५७३ मते मिळाली होती. यावेळी युती आणि आघाडी एकत्रित निवडणूक लढत असल्याने मतविभाजन टळण्याची शक्यता आहे. मात्र सेनेला जिल्ह्य़ात एकही उमेदवारी न मिळाल्याने पक्षात नाराजी आहे तर काँग्रेसच्या नेत्यांना एकजुटीने प्रचारात सहभागी करून घेण्याचे मोठे आव्हान घोडमारे यांच्यापुढे आहे.

दोन घोडमारे रिंगणात

या मतदारसंघात विजय घोडमारे या नावाने दोन उमेदवार रिंगणात आहेत. एक राष्ट्रवादीचे अधिकृत तर दुसरे अपक्ष आहेत. नाव साधम्र्यामुळे मतदारांचा गोंधळ उडू शकतो. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते याबाबत मतदारांना काळजीपूर्वक मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत.

एकूण रिंगणातील उमेदवार १२

एकूण मतदार – ३७५,९२४

२०१४ चा कौल

समीर मेघे (भाजप)

८४,१३९ (विजयी)

रमेश बंग (राष्ट्रवादी)

६०,९८१

कुंदा राऊत (काँग्रेस)

२०,५७३