चंद्रपूर : ताडोबाच्या वाढीव दराविरुद्ध काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज भल्या पहाटे थेट मोहर्ली प्रवेश द्वारावर आंदोलन केल्याने ताडोबा व्यवस्थापनाने नमती भूमिका घेतली. तसेच सात दिवसात तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे पर्यटकांच्या जिप्सी सफरीसाठी जाऊ शकल्या. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात तीन महिन्याच्या विश्रांती नंतर आज १ ऑक्टोबर पासून जंगल सफारी सुरू करण्यात आली आहे. मात्र ताडोबा व्यवस्थापनाने जंगल सफारीत मोठी दरवाढ केली आहे. त्यामुळे ही सफारी सामान्य पर्यटकांच्या आवाक्याबाहेरची झाली आहे. किमान स्थानिकांना प्रवेश शुल्क कमी ठेवा अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली.

दरवाढ कमी केली नाही तर ताडोबा प्रकल्पात एकही जिप्सी जावू देणार नाही असा इशारा दिला होता. त्यानुसार आज १ ऑक्बर रोजी भल्या पहाटे खासदार प्रतिभा धानोरकर ताडोबा मोहरली प्रवेश व्दारा वर कार्यकर्त्यांसमवेत धडकल्याने ताडोबा व्यवस्थापनाची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी खासदार धानोरकर यांनी कोअर आणि बफर सफरीसाठी तब्बल एक हजार रुपयांची वाढ केली. ही वाढ करू नये, असा इशारा दिला. पण त्याला प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी ताडोबा प्रवेशव्दार येथे पोहचताच अधिकारी तिथे आले. त्यामुळे सर्व जिप्सीची चाके जगाच्या जागी थांबली.

शेवटी ताडोबाचे उपसंचालक आनंद रेड्डी यांनी खासदार धानोरकर यांच्याशी चर्चा केली आणि सात दिवसात यावर तोडगा काढू, असे आश्वासन दिले. वाढीव दर कमी न करता स्थानिकांना आठवड्यातून एक दिवस कोअर क्षेत्रातील सफारीत तीस टक्के आरक्षण दिले जाईल, असे आश्वासन ताडोबा व्यवस्थापनाने दिले. यावर समाधान व्यक्त करीत खासदार धानोरकर यांनी आंदोलन मागे घेतले. पण सात दिवसात दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू, असा इशारा धानोरकर यांनी दिला. तर आश्वासन पूर्ण करण्यासाठी स्थानिक सल्लागार समितीपुढे प्रस्ताव ठेवला जाईल आणि त्यानंतर ते अमलात आणले जाईल, अशी माहिती उपसंचालक आनंद रेड्डी यांनी दिले.