गोंदिया : गोंदिया शहरातील बाजारपेठेत मटणापेक्षाही दुप्पट पटीने मशरूम विकला जात आहे. तब्बल १२०० रुपये प्रति किलोने विक्री सुरू आहे. शहरातील मनोहर चौक, रिंगरोड टी पॉईंट, कुडवा नाका चौक हे मशरूमची मुख्य बाजारपेठ. गोंदिया शहरातील जंगली मशरूमची मटणापेक्षा जास्त दराने विक्री सुरू असल्याचे निदर्शनात आले आहे. प्रती किलो मशरूमसाठी १२०० ते १३०० रुपयांचा दर मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या मटण ६५० रुपये किलो आहे. तर मटणापेक्षा दुप्पट पटीने महाग दराने मशरूम मिळत आहे. पाऊस सुरू होताच बाजारपेठेत जंगली मशरूम विक्रीसाठी आले आहे. सध्या या जंगली मशरूमला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. सोबतच चांगला दरदेखील मिळत असून १२०० ते १३०० रुपये प्रति किलो दर मिळत आहे. मटणाला तोडीस तोड म्हणून मशरूमची गणना होते असे खवैये सांगतात. नैसर्गिक वन संपदेने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगले आहेत. या जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागताच जंगलव्याप्त भागात नैसर्गिक पद्धतीने हे मशरूम स्वत: उगवते. याची कुठेही लागवड केली जात नाही. नैसर्गिकरित्या मोठ्या प्रमाणावर जंगलात उगवते. गावकरी सकाळी जंगलात जाऊन मशरूम खोदून आणतात. त्यानंतर मशरूम स्वच्छ पाण्यानं धुवून विक्रीसाठी बाजारात घेऊन जातात.

हेही वाचा – गोंदिया : कार अपघाताने अवैध मद्य वाहतुकीचे बिंग फुटले; दारूसह ९४,२२० रुपयांचा मुद्देमाल जप्त; आमगाव पोलिसांचा निष्काळजीपणा उघड

मशरूम हे आरोग्यासाठी पोषक मानले जाते. पूर्व विदर्भातील जंगल परिसरात मशरूम मोठ्या प्रमाणावर उगवते. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील जंगलात हे मशरूम पाहायला मिळते. विशेषत: बांबू जंगलात याचे उत्पादन जास्त प्रमाणात होते. श्रावण महिन्यात नागरिक मांसाहार करत नाहीत. त्यामुळं या काळात मशरूमला मोठी मागणी असते.

हेही वाचा – नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरींना सक्तीच्या रजेवर पाठवणार?

आयुर्वेदातदेखील मशरूमचे मोठे महत्त्व आहे. शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून आपले पीक चर्चेत आणत असतो. आता चर्चेत असलेले पीक म्हणजे मशरूमची शेती. सध्या गोंदिया शहरातील बाजारपेठेत जंगली मशरूमला मटणापेक्षा प्रति किलो दुप्पट दर असल्यामुळे त्याची चांगलीच चर्चा होत आहे. तसेच मशरूमच्या विक्रीतून शेतकरी चांगलीच कमाई करत आहेत. जुलै शेवट ते संपूर्ण ऑगस्ट महिन्यात मशरूमची जास्तच मागणी असते, असे विक्रेते हर्षदीप उके यांचे म्हणणे आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mushrooms are priced at rs 1200 per kg in shravan month sar 75 ssb