नागपूर : अदानी उद्योग समुहाच्या अंबुजा सिमेंट कंपनीतर्फे प्रस्तावित दहेगाव गोवारी भूमिगत कोळसा खाण प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा कडाडून विरोध केला आहे. बुधवारी नागपुरातील वलनी येथे जनसुनावणी सुरू होण्यापूर्वी संतप्त नागरिकांनी मोर्चा काढत अदानी खाण देण्याला कडाडून विरोध दर्शविला. यावेळी उपस्थिती वाढल्याने स्थानिक नागरिकांना उन्हात उभे राहण्याची पाळी आली. त्यामुळे येथील नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अदानी समूहाच्या अंबुजा सिमेंट्स लि. यांच्या दहेगाव गोवारी भूमिगत कोळसा खाण प्रकल्पासंदर्भात आज जन सुनावणी आयोजित केली आहे.त्यासाठी दहा गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यासाठी प्रशासनाने उभारलेला मंडप लहान पडला. त्यामुळे काहींवर उन्हात उभे राहण्याची पाळी आली. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.
प्रकल्पाला भाजपचे हिंगणाचे आमदार समीर मेघे आणि सावनेरचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी विरोध आहे. भाजपच्या दोन्ही आमदारांनी प्रदूषण मंडळाला दिलेल्या पत्रात म्हटले की, या प्रकल्पामुळे परिसरातील १० गावांसह तेथील शेतकरी, नागरिक, पशुधनासह पर्यावरणाची मोठी हानी होणार आहे. नागरिकांवर रोग व आजारांचे संकट, विस्थापन, जीवाला धोका, उपजीविकेचे साधन हिरावले जाण्याची भीती आहे.
प्रकल्पाची सद्यस्थिती काय ?
दहेगाव गोवारी येथे उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता १ दशलक्ष टन असून, त्याचा विस्तार सुमारे १ हजार ५६२ हेक्टर परिसरात आहे. या प्रकल्पाचा परिणाम गोवारी, सिंदी, खैरी, टोंडा खैरी, बोरगाव खुर्द, बेलोरी, झुनकी, वलनी, खांडाला, पारडी आदी गावांवर होण्याची शक्यता आहे.
आमदार समीर मेघे यांचे म्हणणे काय ?
दहेगाव गोवारी भूमिगत कोळसा खाण प्रकल्पाला स्थानिक नागरिकांसह आमचाही तीव्र विरोध आहे. या प्रकल्पाबाबतच्या सुनावणीत प्रकल्पाची सखोल माहिती घेऊन विरोध दर्शवला जाईल, अशी माहिती हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर मेघे यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली.