नागपूर : काँग्रेस पक्षासह विरोधी पक्षाकडून सत्ताधारी भाजपसोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर एकही टीका करण्याची संधी सोडली जात नाही. या संघाच्या प्रार्थनेची ध्वनिचित्रफीत लोकार्पण सोहळा शनिवारी (२७ सप्टेंबर) नागपुरात थाटात झाला. यावेळी लंडनच्या सुप्रसिद्ध बँडवर संघाची प्रार्थना बसवली गेल्याचे पुढे आले.
नागपुरातील डॉ. हेडगेवार स्मृती भवन, रेशीमबाग येथे हा लोकार्पण समारंभ झाला. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, संगितकार राहूल रानडे, संयोजक हरीश मिमाणी, चितळे उद्योगसमूहाचे संचालक इंद्रनील चितळे आणि इतरही मान्यवर उपस्थित होते. राहूल रानडे म्हणाले, संघाची प्रार्थना ही भारत मातेवर आधारीत आहे. या प्रार्थनेला जगातील सर्वोत्कृष्ठ लंडनच्या राॅयलफलाॅरमेनिक ऑर्केस्ट्राचे संगित दिले गेले आहे. तेथे जागतिक सर्वोत्कृष्ठ वादक आहेत. तेथे ही प्रार्थना संगितबद्ध करण्याचे एक कारणही रानडे यांनी सांगितले. संघाची प्रार्थना लिहली गेली तेव्हा भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते.
आता ८५ वर्षानंतर ब्रिटीश कलावंतांकडून भारत मातेचे वाद्य वाजवल्याने या प्रार्थनेला न्याय ठरेल असे मला वाटले. त्यासाठी संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची परवानगी घेतल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रार्थनेला सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन आणि इतरांची आवाजासह इतरही मोठी मदत मिळाल्याचेही रानडे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन चितळे उद्योग समूहाचे संचालक इंद्रनिल चितळे यांनी केले.
संघाची प्रार्थना संघाने न म्हणता इतर पुढे घेऊन चालले- मोहन भागवत…
संघात आम्ही जेव्हा प्रार्थना गातो, तेव्हा ते गाणारे मनापासून गात असतात. सगळ्यांचे स्वर चांगले नसतात. परंतु ते मनापासून गातात. आपण मन एकटवून प्रार्थनेच्या भावाशी एकरूप होऊन गात असलेले शब्द मनाला भिडतात. त्यातून संघाशी नवीन लोकही जुडतात. ही नवीन रेकाॅर्डिंगही निश्चितपने समाजाला संघाशी जोडेल. या उपक्रमातून संघाची प्रार्थना संघाने न म्हणता इतर पुढे घेऊन जाण्याबाबत मी संघातर्फे आपले धन्यवाद देऊन अभिनंदन करत असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले.
प्रार्थनेत काय ?
प्रार्थनेमध्ये ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमी… आणि शेवट ‘भारत माता की जय..’ असा उल्लेख आहे. त्यात पहिला नमस्कार भारत मातेला आणि नंतर ईश्वराला नमस्कार आहे. प्रार्थनेत भारत मातेला काहीही मागितले नाही. फक्त तिच्या करता जे द्यायचं त्याचा उच्चार आहे. जे मागायचे ते परमेश्वराला मागितले आहे. १९३९ पासून आज पर्यंत स्वयंसेवक रोज शाखेवर प्रार्थना म्हणतात. इतक्या वर्षाच्या या साधनेतून या प्रार्थनेला मंत्राचा सामर्थ्य लाभले असल्याचेही मोहन भागवत यांनी सांगितले.