नागपूर: नागपूरकर असलेल्या डॉ. मंजूषा प्रमोद गिरी यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्राच्या अध्यक्षपदाची निवडणूक मोठ्या फरकाने जिंकली आहे. त्या ‘आयएमए’ महाराष्ट्रच्या इतिहासातील पहिल्या महिला अध्यक्षा ठरल्या आहेत. डॉ. मंजुषा गिरी यांच्याबाबत आपण जाणून घेऊ या.

नागपुरातील प्रसिद्ध न्यूरोडेव्हलपमेंटल बालरोगतज्ज्ञ आणि किशोरवयीन मुलांच्या समुपदेशक म्हणून डॉ. मंजुषा गिरी कार्यरत आहेत. नागपुरातील न्यूरॉन ब्रेन स्पाईन अँड क्रिटिकल केअर सेंटरच्या त्या संचालिका आहेत. २०२४- २५ मध्ये त्यांनी ‘आयएमए’ नागपूरचे अध्यक्षपद भूषविले होते. डॉ. गिरी यांच्याकडे वैद्यकीय कौशल्य, प्रशासकीय अनुभव आणि वैद्यकीय समुदायाला बळकट करण्याची दूरदृष्टी आहे. त्या आयएमए महाराष्ट्रच्या अध्यक्षपदाची नोव्हेंबर २०२६ मध्ये अधिकृतपणे पदभार स्वीकारतील. त्यांच्या निवडीबाबत नागपुरातील वैद्यकीय क्षेत्रासह इतरही क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले आहे. आयएमएच्या नागपूर शाखेच्या अध्यक्ष असतांना त्यांनी किशोयवयीन मुलांमध्ये शालेय पातळीवर जनजागृतीबाबत विशेष मोहीम राबवली होती. त्या स्वतः शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होत्या.

डॉक्टरांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी डॉ. गिरी म्हणाल्या…

आयएमए राज्य अध्यक्ष पदाची निवडणूकीत विजय मिळाल्यानंतर प्रसिद्धिमध्यमांशी बोलताना डॉ. मंजुषा गिरी म्हणाल्या, हा माझा विजय नाही, तर प्रत्येक ‘आयएमए’ सदस्याचा, माझ्या पाठीशी असलेल्या माझ्या कुटुंबीयांचा आणि मित्रांचा आहे. राज्यातील सर्व डॉक्टरांना एकत्र आणण्याची आणि त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची मोठी जबाबदारी आली आहे. आपण सर्वजण मिळून ‘आयएमए’ महाराष्ट्राला नव्या उंचीवर घेऊन जाऊ, असेही डॉ. मंजुषा गिरी यांनी सांगितले.

महिलांच्या नेतृत्वस्थानी आणण्याच्या दिशेने…

डॉ. गिरी यांची निवड वैद्यकीय क्षेत्रात महिलांना नेतृत्वस्थानी आणण्याच्या दिशेने एक प्रगतिशील पाऊल मानले जात आहे. हे यश तरुण डॉक्टरांसाठी, विशेषतः महिलांना उत्साहित करणारे आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे सर्वांना सोबत घेऊन प्रगतिशील सुधारणा होईल आणि राज्यातील डॉक्टरांचा सामूहिक आवाज अधिक मजबूत होईल, अशी आशा वैद्यकीय क्षेत्रात व्यक्त केली जात आहे.

‘आयएमए’ संघटनेबाबत…

इंडियन मेडिकल असोसिएशन ( आयएमए ) ही भारतातील डॉक्टरांची एक खाजगी, राष्ट्रीय स्वयंसेवी संघटना आहे . तिची स्थापना १९२८ मध्ये ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन म्हणून झाली आणि १९३० मध्ये तिचे नाव बदलून इंडियन मेडिकल असोसिएशन असे ठेवण्यात आले. ही सोसायटी ऑफ इंडिया अ‍ॅक्ट अंतर्गत नोंदणीकृत एक संस्था आहे. या संघटनेच्या देशातील बहुतांश जिल्यात शाखा आहेत. या शाखेकडून डॉक्टर आणि समाजातील दुर्लक्षित घडकासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात.