नागपूर : ‘परख’ संस्थेच्या वतीने शाळांच्या सर्वेक्षणाचा अहवाल जाहीर करण्यात आला नसून नागपूर जिल्ह्यातील शिक्षणाची स्थिती गंभीर असल्याचे दिसून येते. यामध्ये नवव्या वर्गातील ६४ टक्के विद्यार्थ्यांना सातचा पाढा म्हणता येत नसून साधा गुणाकारही करता येत नसल्याचे वास्तव आहे. गणितासह सामाजिक शास्त्राच्या विषयातही विद्यार्थ्यांची परिस्थिती मागासलेली आहे. तर तिसरीमधील ५४ टक्के विद्यार्थ्यांना वर्तुळ, त्रिकोण, बिंदू, रेषा यांसारख्या मूलभूत भूमितीय आकृत्यांची माहिती नसल्याचे चित्र आहे.
शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या परख या राष्ट्रीय मूल्यांकन संस्थेने देशव्यापी सर्वेक्षण केले आहे. नुकतेच सर्वेक्षण जाहीर झाले असून यामध्ये नागपूर जिल्ह्याची इयत्ता तिसरी, सहावी आणि नववीतील विद्यार्थ्यांमध्ये अधिक सुधारणेची आवश्यकता असल्याचे चित्र आहे. या सर्वेक्षणानुसार, नववीतील ६४ टक्के विद्यार्थ्यांना सातचा पाढा येत नसून इयत्ता तिसरीमधील ५४ टक्के विद्यार्थ्यांना वर्तुळ, त्रिकोण, बिंदू, रेषा यांसारख्या मूलभूत भूमितीय आकृत्यांची माहिती नाही. सर्वेक्षणामध्ये नववीतील विद्यार्थ्यांची भाषा, गणित, पर्यावरण, विज्ञान, सामाजिक शास्त्र या विषयांच्या अनुषंगाने आकलन क्षमता जाणून घेण्यात आली. त्यात विद्यार्थ्यांची एकूण कामगिरी ५४ टक्के आढळली. इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांची पर्यावरण, गणित आणि भाषा या विषयातील एकूण कामगिरी ५८ टक्के आहे. इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांची भाषा, गणित या विषयातील एकूण कामगिरी ६२ टक्के आहे. नवव्या वर्गाच्या सर्वेक्षात केवळ ३८ टक्के विद्यार्थ्यांनाच भूमितीय गणितांचा अभ्यास आहे. त्यामुळे इतर विद्यार्थी वर्तुळ, त्रिकोणाचा वापर करता येत नाही. सहाव्या वर्गातील ४२ टक्के विद्यार्थ्यांना मोठ्या संख्यांची ओळख नाही. त्यांना मोठे वाक्य आणि मोठी संख्या वाचता येत नसल्याची चिंता सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यात नागपूर जिल्हा पिछाडीवर
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून महाराष्ट्रातील शाळांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले आहे. त्यानुसार शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी परख ही राष्ट्रीय मूल्यांकन संस्था स्थापन करण्यात आली. या सर्वेक्षणात नागपूर जिल्ह्यातील १२९ शाळेतील ४२३ शिक्षकांनी आणि ३,८१६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. राज्याचा विचार करता नागपूर जिल्ह्याचा क्रमांक इयत्ता तिसरीमध्ये एकतिसावा, इयत्ता सहावीमध्ये बाविसावा तर इयत्ता नववीमध्ये विसावा लागला आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता तिसरीमधील १ हजार १८८, इयत्ता सहावीमधील १ हजार १०० तर इयत्ता नववीमधील १ हजार ५२८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
केवळ ५५ टक्के विद्यार्थी लघुकथा वाचू् शकतात
सर्वेक्षणात तिसरीमधील विद्यार्थ्यांची भाषाक्षमता तपासली असता केवळ ५५ टक्के विद्यार्थी लघुकथा वाचू आणि अर्थ समजू शकतात. म्हणजे ४५ टक्के विद्यार्थी यामध्ये कच्चे आहेत. तिसरीतील ५७ टक्के विद्यार्थी त्यांना शंभर रुपयाची नोट दिल्यास ते आर्थिक व्यवहार करू शकत नाही. तर इयत्ता नववीतील ५४ टक्के विद्यार्थी वृत्तपत्र वाचत असल्याचे या सर्वेक्षणात आढळले आहे.
शैक्षणिक सुधारणेच्या सूचना
सर्वेक्षणामध्ये ‘परख’ने इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी काही शिफारशी केल्या आहेत. यामध्ये नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेत वाढ करणे, कमकुवत विद्यार्थी ओळळून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी यंत्रणा लागू करणे, शैक्षणिक सुधारणा व विद्यार्थ्यांना डिजिटली अद्ययावत करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आदींचा समावेश आहे.