नागपूर : मध्य भारतात सुमारे ७८ वर्षांपूर्वी हौशी उड्डाणप्रेमींनी स्थापन केलेल्या नागपूर फ्लाईंग क्लबला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी वाटचाल सुरू झाली आहे. केंद्र शासनाच्या नागरी विमान महासंचालनालयाने (डीजीसीए) या क्लबला ‘ब’ श्रेणीमध्ये टॉप टेन नामांकन दिले आहे. नागपूर फ्लाईंग क्लब हे मध्य भारतातील सर्वांत जुनी विमान उड्डाण प्रशिक्षण संस्था आहे. भारतातील सर्वात स्वस्त फ्लाइंग स्कूल म्हणून देखील ओळखले जाते. राज्य सरकारने या क्लबला १९९० साली ताब्यात घेतले. तेव्हापासून विभागीय आयुक्त (महसूल) यांच्या मार्फत ते चालवण्यात येते. हा क्लब नागपूर येथे आहे.
सध्या मोरवा (चंद्रपूर) विमानतळावर प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेने भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक उद्योगासाठी अनेक कुशल वैमानिक घडवले आहे. आता डीजीसीएच्या मानांकनानंतर त्याची भरभराट होण्याची शक्यता आहे. नागपूर फ्लाईंग क्लबला ब श्रेणीमध्ये टॉप टेन नामांकन जाहीर केले आहे.नागपूर फ्लाईंग क्लबचे महाराष्ट्र शासनातर्फे संचलन करण्यात येत असून या क्लबकडे चार प्रशिक्षणार्थी विमान आहे.
केंद्र शासनाच्या भारतीय नागरी विमान महासंचालनालयातर्फे उड्डाण प्रशिक्षणाकरिता मान्यता प्रदान करण्यात आली आहे. नागपूर येथे प्रशिक्षणासाठी पुरेसा वेळ उपलब्ध होत नसल्याने चंद्रपूर येथील मोरवा विमानतळावर दुसरा बेस तयार करण्यात आला आहे. तेथे प्रशिक्षणालाही डीजीसीएची उड्डाण प्रशिक्षणाकरिता मान्यता मिळाली आहे.भारतातील मान्यताप्राप्त विमान प्रशिक्षण संस्थांमध्ये असलेल्या सुविधासंदर्भात नागरी विमान महासंचालनालयातर्फे नामांकन यादी जाहीर करण्यात येते. १ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आलेल्या नामांकनातील प्रत्यक्ष विमान प्रशिक्षणासंदर्भातील वर्गवारीनुसार ‘ब’ श्रेणीमध्ये एकूण १३ संस्थांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर फ्लाईंग क्लब दहाव्या क्रमांकावर आहे. या क्लबसाठी मोरवा विमानतळावर प्रशिक्षणासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
१२ फेब्रुवारी २०२५ पासून ७७२ पेक्षा जास्त तास उड्डाण प्रशिक्षण पूर्ण केले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी सेसना-१५२ या श्रेणीतील तीन विमाने तर सेसना-१७२ या श्रेणीतील एक विमान आहे. प्रत्येक प्रशिक्षण तुकडीत ४१ प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा समावेश असून यापैकी २६ विद्यार्थ्यांचे उड्डाण प्रशिक्षण व १० प्रशिक्षणार्थ्यांचे ग्राऊंड प्रशिक्षण सुरु आहे. अल्पावधितच नागपूर उड्डाण क्लबने प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेल्या व्यवस्था पूर्ण केल्यामुळे भारत सरकारच्या नागरी विमान महासंचालनालयातर्फे ब श्रेणीमध्ये समावेश होऊन पहिल्या १० मध्ये मानांकन मिळाले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त तथा नागपूर फ्लाईंग क्लबच्या अध्यक्ष विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिली. नागपूर विमानतळावर प्रशिक्षणासाठी पुरेसा वेळ न मिळाल्याने क्लबचे प्रशिक्षण मोरवा येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. नागपूर फ्लाईंग क्लबचे प्रशिक्षण दोन वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील मोरवा येथे सुरू आहे.