नागपूर : नागपूर ‘हिट अँड रन’ रन प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहेत. या सीसीटीव्ही फुटेजमधून अपघाताची भीषणता लक्षात येते. गेल्या दोन दिवसांपासून या अपघाताची शहरभर चर्चा होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज अधिकृतरित्या जारी केले नसले तरी समाजमाध्यमांवर या अपघाताच्या थराराची चित्रफित प्रसारित झाली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे आणि त्याचे दोन मित्र अर्जून हावरे आणि रोनित चिंतमवार हे ऑडी कारने काचीपुरा चौकातून ताशी १५० किमीच्या वेगाने जात होते. सेंट्रल पॉईट हॉटेलसमोर त्यांनी एका कारला धडक दिली. ती धडक एवढी भयंकर होती की ऑडी कारचाही समोरचा भाग चक्काचूर झाला तर धडक बसलेल्या कारचे मोठे नुकसान झाले. या अपघाताचा सर्व थरार दर्शवणारे सीसीटीव्ही समोर आले आहे.

हेही वाचा – संकेतच्या कारची मानकापूर चौकातही पोलो कारला धडक, तिघांनाही मारहाण ..

कारला धडक देताच जवळपास ३० ते ४० नागरिक अपघातस्थळाकडे धावताना दिसत असून संकेतने कारने पळ काढल्याचे दिसत आहे. सोमवारपासून या अपघाताची शहरभर चर्चा असून सध्या विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप सुरु आहे. शिवसेनेच्या (उबाठा) उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनीही संकेत बावनकुळेच मद्यप्राशन करून कार चालवित असल्याचा आरोप केला होता तर संजय राऊत यांनीही संकेत बावनकुळेला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका केली आहे. भरधाव ऑडी कारने जीतू सोनकांबळेच्या कारला धडक दिल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. संकेतच्या ऑडीने धडक दिल्यानंतर तेथे नागरिक अपघातस्थळाकडे धाव घेताना दिसत आहेत. तर संकेत मित्रांसह कारने पळ काढताना दिसत आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यामुळे कारचा वेग आणि अपघाताची भीषणता लक्षात येत आहे. या अपघातानंतर नागरिकांनीच सीताबर्डी पोलिसांना माहिती दिली. जीतेंद्र सोनकांबळेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हे दाखल केले. मात्र, संकेत सोडून अन्य दोघे अर्जून आणि रोनित यांनाच ताब्यात घेण्यात आले होते.

हेही वाचा – “आमदार पुत्र आहे म्हणून झुकते माप नको, निष्पक्ष चौकशी व्हावी”, काय म्हणाले काँग्रेस आमदार…

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतःहून चित्रफित जारी करीत अपघातास कारणीभूत ठरलेली कार संकेतची असल्याचे कबुल केले. तसेच या प्रकरणाची पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करावी. या गुन्ह्याचा पारदर्शक तपास व्हावा. दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया दिली होती. अपघातात संकेत बावनकुळेचा सहभाग असल्याचे लपविणाऱ्या पोलीस विभागाला मात्र तोंडघशी पडावे लागले. त्यामुळे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनीही संकेतची चौकशी केल्यानंतर तो कारमध्ये बसला होता, अशी प्रतिक्रिया दिली.