नागपूर : राज्यभरात बहुचर्चित ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यामध्ये सायबर पोलिसांनी शनिवारी दुपारी धंतोलीतील शिक्षण उपसंचालक कार्यालयात छापा घातला. या छाप्यात उपसंचालक कार्यालयातील महत्वपूर्ण काही फायली आणि संगणक संच जप्त करण्यात आला. या संगणकात नरड याने तयार केलेल्या बनावट आयडीची सर्व माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. यावेळी पोलिसांसोबत मुख्य आरोपी शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यालाही सोबत घेतले होते.

सायबर पोलिसांनी शनिवारी दुपारी शिक्षण उपसंचालक कार्यालयात अचानक छापा घातला. यावेळी उपसंचालक उल्हास नरडलाही पोलिसांनी उपसंचालक कार्यालयात नेले होते. पोलिसांचे वाहन बघताच अनेकांच्या मनात धडकी भरली होती. आरोपींच्या पिंजऱ्यात असलेल्या नरडने पोलिसांना काही महत्वपूर्ण फायली कार्यालयातून काढून दिल्या. तसेच नरडने स्वतःचे संगणक उघडून दिले. त्यामध्ये आतापर्यंत तयार करण्यात आलेल्या सर्वच शालार्थ आयडीची माहिती मिळून आली. बोगस शालार्थ आयडी कधी तयार करण्यात आल्या, ‘अॅक्टीव्ह’ केव्हा करण्यात आल्या आणि कुणी तयार केल्या, याबाबतची माहिती ‘आयपी एड्रेस’वरुन पोलिसांना मिळाली. त्यामुळे सायबर पोलिसांना शनिवारी तपासात मोठे यश आल्याचे बोलले जाते. जवळपास दोन तास सायबर पोलीस उपसंचालक कार्यालयात तपासणी करीत होते. सायबर पोलीस संगणक, फायलीसह काही महत्वपूर्ण कागदपत्रे घेऊन थेट सायबर पोलीस ठाण्यात पोहचले. या प्रकरणी उल्हास नरडची चौकशी सुरु आहे. उद्या रविवारी नरडला पुन्हा न्यायालयात उपस्थित करण्यात येणार असून त्याची पुन्हा पोलीस कोठडी मागण्यात येणार असल्याची माहिती सायबर पोलिसांनी दिली.

आणखी तिघांना होणार अटक

बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार उल्हास नरडने घोटाळ्यातील आणखी तिघांची नावे पोलिसांना सांगितली आहे. त्यापैकी एक अधिकारी नागपूर शहर सोडून अन्य ठिकाणी रुजू आहे. तसेच नागपुरातसुद्धा कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सायबर पोलीस अटक करणार आहेत. त्यामुळे आरोपींमध्ये आणखी तिघांची भर पडणार आहे.

महेंद्र म्हैसकरच्या घराता आढळल्या २२ फायली

‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यामध्ये अटक करण्यात आलेल्या गोंदिया जिल्ह्यातील परसटोला येथील शिक्षक महेंद्र म्हैसकर याच्या इंदोऱ्यातील घरावर सदर पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात पोलिसांनी २२ फायली मिळाल्या असून त्यामध्ये जवळपास २०० शिक्षकांचे प्रस्ताव आहेत. येत्या काही दिवसांत म्हैसकरच्या माध्यमातून गोंदीया आणि भंडारा जिल्ह्यातील जवळपास २०० युवक बोगस शिक्षक पदावर नियुक्त होणार होते, अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. महेंद्र म्हैसकर या शालार्थ आयडी प्रकरणातील मध्यस्थ असून त्याच्या मध्यस्थीने आतापर्यंत राज्यभरात शेकडो बोगस शिक्षक नोकरी करीत असल्याची माहिती समोर आली. सुशिक्षित कुटुंबातील महेंद्र याच्यावर आतापर्यंत फसवणुकीचे पाच ते सहा गुन्हे दाखल असल्याची चर्चा आहे. त्याला शुक्रवारी अटक केली असून तो तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे.

बेरोजगार तरुण-तरुणी म्हैसकरच्या संपर्कात

महेंद्र म्हैसकर याचे आईवडिल दोघेही सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत तर पत्नीसुद्धा शिक्षिका आहे. महेंद्र याने डीएड् किंवा बीएड् केले नसून बोगस प्रमाणपत्राच्या आधारे तो शिक्षक म्हणून नोकरीवर लागल्याची चर्चा आहे. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना लाखो रुपयांच्या मलिदा चारणाऱ्या महेंद्रच्या संपर्कात शेकडो बेरोजगार तरुण-तरुणी होत्या. त्यांची शैक्षणिक कागदपत्रे महेंद्रने तयार केली होती.