नागपूर : अभ्यासपूर्ण वाणी आणि लेखणीने भल्याभल्यांना घाम फोडणारा साताऱ्याचा ‘ढाण्या वाघ’ अशी ज्याने आपली ओळख निर्माण केली आहे, त्या ‘ढाण्या वाघा’ला म्हणजेच अभिनेता किरण माने यांना वाघिणीने तिच्या बछड्यासह दर्शन दिले.
एका वाघाने दुसऱ्या वाघिणीला साद दिली आणि दोघांचेही कुटुंब समोरासमोर आले. विदर्भात कार्यक्रमानिमित्त आलेल्या अभिनेता किरण मानेसोबत यावेळी त्यांचे कुटूंबिय देखील होते.विदर्भात आल्यानंतर व्याघ्रदर्शन करणार नाही, असे सहजासहजी कुणी करत नाही. त्यातून हा तर साताऱ्याचा ‘ढाण्या वाघ’. त्यांच्यासोबत मित्र हरिश इथापे, संजय इंगळे तिगावकर होते आणि मग त्यांनी रात्रीतूनच व्याघ्रदर्शनाचा कार्यक्रम आखला. मध्यरात्रीपर्यंत गप्पांचा फड रंगल्यानंतरही पहाटे साडेपाच वाजता ते वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्रप्रकल्पात व्याघ्रसफारीला निघाले.खरं तर माने यांच्या मुलीने याआधी जंगलात सफारी केली होती, पण त्यांच्यासाठी ही पहिलीच सफारी होती.
विदर्भात आल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी बोर व्याघ्रप्रकल्पात पाऊल ठेवले. बोरधरण प्रवेशद्वारातून समोर जात नाही तोच साताऱ्याच्या या ‘ढाण्या वाघा’ला बोर व्याघ्रप्रकल्पातील ‘बीटीआर-३’ म्हणजेच ‘कॅटरिना’ ही वाघीण त्यांच्यासमोर आली. ती एकटीच नव्हती तर तिचे बछडे देखील तिच्यासोबत होते. एकीकडे ‘माने’ यांचे कुटुंबिय तर दुसरीकडे ‘कॅटरिना’चे कुटुंब आणि दोघेही एकाक्षणी समोरासमोर आले.
किरण माने त्यांच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल ओळखले जातात. त्यांचा हा स्पष्टवक्तेपणा अभ्यासपूर्ण असतो. त्यामुळे समोरच्याला त्यांचे मुद्दे खोडूनच काढता येत नाही. एकीकडे अभिनयाची उंची तर दुसरीकडे लेखणी आणि वाणीही तेवढीच उंच. त्यामुळे त्यांच्या अभिनयाचे आणि लेखणी व वाणीचे चाहतेही तेवढेच अधिक आहेत. समाजमाध्यमावर त्यांची लेखणी तर टीव्हीवर त्यांचा अभिनय कायम गाजत असतो. मात्र, कायम पाय जमिनीवर असणाऱ्या या अभिनेत्यामध्ये कधी ‘सेलिब्रिटी’ दिसून आला नाही. त्यामुळे त्यांची व्याघ्रसफारी ही विशेषच होती.
एरवी ‘सेलिब्रिटी’ म्हटले की त्यांची धाव व्याघ्रदर्शनासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाकडे असते. त्यामुळे या व्याघ्रप्रकल्पातील वाघही आता ‘सेलिब्रिटी’ झाले आहेत. मात्र, किरण माने यांनी वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्रप्रकल्पाची निवड केली. या व्याघ्रप्रकल्पातील वाघांनीही त्यांना निराश केले नाही.‘कॅटरिना’ नावाच्या वाघिणीने अवघ्या काही मिनिटातच त्यांना दर्शन दिले. तीच्यासोबत तिचे बछडेदेखील होते. पहिल्यांदाच व्याघ्रदर्शन झाल्याने साताऱ्याचा हा ढाण्या वाघ देखील आनंदी झाला आणि पुन्हा याठिकाणी येण्याचा निश्चय केला.
© The Indian Express (P) Ltd