नागपूर : स्थापनेपासूनच वादात अडकलेल्या रामदास पेठेतील मेडिट्रिना रुग्णालयाचा घोटाळेबाज सह संचालक डॉ.समीर पालतेवार याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने शनिवार १८ ऑक्टोबर पर्यंत वाढ केली.
डॉ. पालतेवार विरोधात संस्थापक गणेश चक्करवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी आणखी एक गुन्हा दाखल करत त्याला अटक केली होती. रुग्णालयात विविध सरकारी योजनांचा लाभ दिला जातो. त्या अंतर्गत लाभार्थींवर रुग्णालयाकडून उपचार होतो. त्यासाठी रुग्णालय स्वत:च खर्च करते. पुढे हा खर्च सरकारकडून निधी स्वरुपात मिळतो.
यासाठी रुग्णालयाचे बँकत खाते होते. त्यात हा पैसा जमा होत असे. मात्र, पालतेवारने अवैधरीत्या हा पैसा आपल्या शेल कंपनीच्या खात्यात वळविला, असा आरोप चक्करवार यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान आज पालतेवारला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पोलिस कोठडीत १८ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली.
असा केला गैरव्यवहार
नवीन इस्पितळाचे बांधकाम करण्यासाठी नियमांनुसार डॉक्टरकडे ६७ टक्के शेअर आवश्यक असल्याने रुग्णालयाचे भागीदार असलेले व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट गणेश चक्करवार यांनी १७ टक्के शेअर्स तात्पुरते बुक व्हॅल्युवर ट्रान्सफर करत सोनाली पालतेवारला अतिरिक्त संचालक बनविले. मात्र त्यानंतर डॉ.पालतेवारने मनमर्जीने सुरु केली. पालतेवार दांपत्याने मुलगा निनादसोबत ऑब्व्हिएट हेल्थकेअर प्रा.लि. ही कंपनी स्थापन केली. त्यांनी २०२०-२१ मध्ये मेडिट्रिनाच्या खात्यातून दोन, २०२१-२२ मध्ये २.९१ , २०२२-२३ मध्ये ३.३६ व २०२३-२४ मध्ये ३.१३ असे एकूण ११.४१ कोटी रुपये काढले. याची कुठलीही कल्पना आपल्याला दिली गेली नाही , असे चक्करवार यांचे म्हणणे आहे. खोटी बिले तयार करून करोडो रूपये कंपनीच्या बँक खात्यातुन काढले. चक्करवार यांनी वार्षिक अहवालाची पाहणी केली असता डिजिटल मार्केटिंग व जाहिरातींच्या नावाखाली बनावट बिले तयार केल्याची बाब समोर आली.
हे देखील सह आरोपी….
मेडिट्रिनाचे अंकेक्षण अधिकारी अर्पण पांडेसह किशोर पांडेच्, अभिषेक पांडे ॲबस्ट्रॅक्ट आयटी ग्रुप, आकाश केदारची कंपनी एके हेल्थकेअर सर्व्हिसेस, मुकेश बडवाईकची एमबी हेल्थ केअर सर्व्हिसेस, वैशाली बडवाईक, तृप्ती घोडे, रिता बडवाईक, कल्याणी बडवाईक, नईम दिवाण, सर्वेश ढोमणे, प्रियंका ढोमणे यांच्या पी.एस.हेल्थ केअर सर्व्हिसेस, अलाईड हेल्थकेअर सर्व्हिसेसच्या खात्यात बेकायदेशीर मार्गे कोट्यवधी जमा करण्यात आले. चक्करवार यांच्या तक्रारीवरून या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना पोलिसांनी सह आरोपी केले आहे.