अमरावती : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत, अमरावती शहरातील पोलीस हवालदार प्रवीण आखरे यांनी एका अजोड साहसी प्रयोगातून देशभक्ती आणि शारीरिक क्षमतेचे अद्भुत प्रदर्शन घडवले आहे. त्यांनी श्वसन सहाय्यक साधने (ऑक्सिजन सिलिंडर) न वापरता, जलतरण तलावात १५ फूट पाण्याखाली स्केटिंग करत तिरंगा फडकवून अनोखी कामगिरी केली आहे.

अमरावतीचे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस जलतरण केंद्रावर हा धाडसी उपक्रम पार पडला. प्रवीण आखरे यांनी पाण्याखाली स्केटिंग करताना कोणतीही श्वसन सहाय्यक साधने वापरली नाहीत. पाण्याखाली स्केटिंग करणे हेच मुळात एक मोठे आव्हान असताना, हातात तिरंगा घेऊन तो डौलाने फडकवणे हे त्यांच्या विलक्षण कौशल्याचे आणि आगळ्या साहसाचे प्रतीक ठरले.

केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतातील अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग आहे. पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची शारीरिक क्षमता आणि त्यांची देशभक्ती किती प्रबळ आहे, याचे हे उत्तम उदाहरण असल्‍याचे यावेळी सांगण्‍यात आले. पोलीस हवालदार प्रवीण आखरे यांच्या या प्रयत्नाचे उपस्थित मान्यवर आणि सहकाऱ्यांनी भरभरून कौतुक केले.

या ऐतिहासिक आणि साहसी कामगिरीमुळे अमरावती शहर पोलीस दलाचे नाव राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्वल होण्याची होईल, अशी अपेक्षा व्‍यक्‍त करण्‍यात आली. या कामगिरीबद्दल त्‍यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

प्रवीण आखरे हे उत्तम जलतरणपटू आणि योगाभ्यासक आहेत. त्‍यांनी सप्‍टेंबर २०२३ मध्‍ये सलग एक तास दोन मिनिटे पाण्‍यात उभ्‍या स्थितीत राहण्‍याचा विक्रम पूर्ण केला होता. आशिया बूक ऑफ रेकॉर्डने त्‍याची नोंद घेतली होती. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डचे प्रतिनिधी मनोज तत्त्ववादी यांनी प्रविण आखरे यांच्या या दोन्ही विक्रमांची घोषणा केली होती. ५१ ते ६० वयोगटात पाण्यात सलग एक तास दोन मिनिटे उभे राहण्याचा विक्रम आजवर कोणीही केलेला नाही. या वयोगटात हा नवा विक्रम स्थापन करणारे अजय आखरे हे एकमेव असल्याचे मनोज तत्ववादी यांनी सांगितले होते.

अमरावती पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले प्रवीण आखरे यांनी पोहण्यात विशेष कौश आत्मसात केले आहे. पोलीस आयुक्तालयाअंतर्गत असलेल्या जलतरण केंद्राची देखभाल ते करतात. अनेक तरूणांना पोहण्याचे प्रशिक्षणही ते देतात. २१ जून या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रवीण आखरे यांनी ११ फूट खोल पाण्याखाली विविध योगासनांचे प्रात्यक्षिके सादर केली होती.