नागपूर : विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर तब्बल सहा वर्षानंतर एकदिवसीय सामन्याचे आयोजन केले जाणार आहे. येत्या ६ फेब्रुवारी रोजी हा बहुप्रतिक्षित सामना भारत विरुद्ध इंग्लंड संघादरम्यान होणार आहे. तीन सामन्याच्या या शृंखलेतील पहिलाच सामना नागपूरमध्ये होणार असल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये चांगलाच उत्साह आहे. या उत्साहाचे दर्शन सामन्याच्या तिकिटविक्री दरम्यान बघायला मिळाले. रविवारी सकाळी १० वाजतापासून या सामन्याची ऑनलाईन तिकिट विक्रीला सुरुवात झाली आणि अवघ्या काही मिनिटातच संपूर्ण तिकिटे विकली गेली. सहा वर्षानंतर नागपुरात सामना होत असल्याने तिकिटविक्री सुरू होण्यापूर्वी एक लाखाहून अधिक चाहते ऑनलाईन वेटिंग लिस्ट मध्ये होते. व्हीसीएने प्रत्येक व्यक्तीला तिकिटविक्रीसाठी दोन तिकिटांची मर्यादा घातली असल्यामुळे अनेकांनी एकापेक्षा अधिक डिव्हाईसमधून तिकिटसाठी प्रयत्न केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

४४ हजारांची क्षमता

भारत विरुद्ध इंग्लंड सामना ६ फेब्रुवारी दुपारी दीड वाजल्यापासून व्हीसीएच्या जामठा मैदानावर खेळविला जाईल. या मैदानाची क्षंमता सुमारे ४४ हजार लोकांची आहे. या मैदानावर अंतिम सामना २०१९ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरोधात खेळविण्यात आला होता. जामठाच्या मैदानावरील हा आतापर्यंतचा नववा एकदिवसीय सामना असेल तर नागपूरमधला एकूण २३ वा एकदिवसीय सामना राहील. ६ फेब्रुवारी होणाऱ्या सामन्यासाठी तीन फेब्रुवारीला दोन्ही संघ नागपूरमध्ये येतील. ४ आणि ५ फेब्रुवारीला दोन्ही संघ सराव करतील. नागपूरमधील सामन्यासाठी तिकिटविक्री ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली. ही तिकिटविक्री जोमॅटोच्या डिस्ट्रिक्ट ॲपच्या माध्यमातून झाली. सामान्य लोकांसाठी तिकिटविक्री सुरू होण्यापूर्वी व्हीसीए सदस्यांना तिकिटविक्री करण्यात आली. ऑनलाईन तिकिट घेतल्यावर लोकांना ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान प्रत्यक्ष तिकिट घ्यावे लागेल. व्हीसीएच्या सिव्हिल लाईन्स येथील मैदानावर ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान सकाळी ९.३० ते रात्री ८.३० दरम्यान चाहत्यांना तिकिट घ्यावे लागेल. ६ फेब्रुवारी रोजी सामन्याच्या दिवशी सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत ही सुविधा उपलब्ध राहील. यंदाही शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच अनाथ मुलांसाठी व्हीसीएमार्फत तिकिट उपलब्ध करून देण्यात आले.

ब्लॅक मार्केटिंगला सुरुवात

सकाळी १०.३० च्या दरम्यान बहुतांश तिकिटांची विक्री झाली होती. यानंतरही सुमारे पन्नास हजार लोक प्रतीक्षा यादीत होते. समाज माध्यमावर अनेक लोकांनी तिकिट न मिळण्याची तक्रार केली. दुसरीकडे, समाज माध्यमांवरच अनेक लोकांनी तिकिटे मिळाली असून तिकिटे ब्लॅकमध्ये विकण्याबाबत संदेश टाकले. ८०० रुपयांची तिकिटाची किंमत २ ते ३ हजार तर एक हजाराच्या तिकिटाचा दर पाच ते सात हजार रुपये सांगण्यात येत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur on sunday india vs england series first match online ticket sales began and sold out within minutes tpd 96 sud 02