नागपूर : रेल्वे तिकीट तपासणी (टीटीई) तिकीट तपासून दंड वसूल करण्यात व्यस्त असल्याचे चित्र रेल्वे स्थानक आणि रेल्वेगाड्यांमधून दिसून येते. किंबहुना विनातिकीट प्रवासी किंवा सर्वसाधारण तिकीट काढून शयनयान डब्यात चढल्याचे आढळल्यास टीटीईचा पारा वाढलाच म्हणून समजा. एका टिटीईने मात्र बेशुद्ध अवस्थेत नागपूर रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना आधार देत प्राण वाचवले.

अलिकडे सर्वांनाच घाई असल्यासारखी धावपळ दिसते. रस्त्यावर कोणी कन्हत पडलेला असलेतर त्याला मदत मिळलेच याची शाश्वती नाही. अनेकदा विनाकारण झंझट नको म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून जाण्याचे पसंत केले जाते, परंतु अजूनही संवेदना शिल्लक असल्याचे आणि सरकारी नोकरीच्याही पलिकडे जावून काही चांगले करता येते हे नागपूर रेल्वे स्थानकावरील घटनेतून दिसून आले.

नागपूर रेल्वेस्थानकाच्या कर्तव्यावर असलेल्या वरिष्ठ तिकीट परीक्षक अमित बरेलिया यांना एक प्रवासी बेशुद्ध अवस्थेत असल्याचे समजले. या प्रवाशाला खूप घाम येत होता आणि मदतीची विनंती करत होता. त्याला नीट बोलताही येत नव्हते. वेळ न दवडता त्याला फलाट क्रमांक १ जवळील एका रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे प्रवाशाचे प्राण वाचले.

बरेलिया यांनी वेळ न दवडता मानवतेची आणि प्रसंगावधानाची जाणीव दाखवत तातडीने मदत केली. हा प्रवासी एकटाच होता, त्याच्याकडे भ्रमणध्वनी संच, तिकीट किंवा जवळ कोणी नातेवाईकही नव्हते. त्यांनी लगेच प्रवाशाचे सामान उचलले आणि त्याला आधार देत प्लॅटफॉर्म क्रमांक १ जवळील एका हॉस्पिटलमध्ये पोहोचवले. तेथे तपासणी केल्यानंतर या रुग्णालयाने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून रुग्णवाहिका बोलावण्यात आली आहे. रुग्णाची स्थिती बघता तातडीने स्थानांतरित करण्यात आले आहे. टीटीई दाखवलेल्या साहसी कृतीबाबत तिकीट तपासणी विभाग व आयआरसीएसओकडून अभिनंदन करण्यात आले.

आरपीएफ क्राईम इंटेलिजन्स शाखेची नागपूर रेल्वे स्टेशनवर ४८ हजार किंमतीचा अमली पदार्थ जप्त करण्यात आले. नशेच्या पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण मोहिमेत, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे गुप्तचर शाखेने २१ जून २०२६ रोजी नागपूर रेल्वे स्थानकावर ट्रेन क्रमांक १२४०९ मधील एक लावारस बॅग तपासून ३.२ किलो गांजा जप्त केला.

या कारवाईचे नेतृत्व गुन्हे गुप्तचर शाखेचे निरीक्षक यांच्या आदेशानुसार करण्यात आले. प्रमुख आरक्षक जब्बीर सिंह, अजय सिंह तसेच श्वान ‘प्रिन्स’ आणि त्याचा हँडलर आरक्षक नीरज कुमार यांनी दुपारी पावणे दोन वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक ४वर आलेल्या गाडीत ही संशयित बॅग आढळली.