चंद्रपूर : पदपथावर टोपल्या विकून आपला संसार चालवणाऱ्या आणि अनेक लढ्यांतून पदपथ विक्रेत्यांना न्याय मिळवून देणाऱ्या गंगुबाई जोरगेवार उर्फ अम्मा या संघर्षशील महिलेला सन्मान देण्यासाठी, त्यांच्या व्यावसायिक जागेला ‘अम्मा चौक’ असे नाव देण्याची मागणी पदपथ असोसिएशनने केली.

मात्र, दुर्दैवाने या प्रस्तावाला काही राजकीय व्यक्तींकडून विरोध होत आहे, ही भूमिका निंदनीय असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे. त्या आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री नसत्या, तर चौक निर्मितीची मागणी समोर आली असती का, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. यावरून शहर काँग्रेस विरुद्ध भाजप आमदार जोरगेवार आणि पदपाथ असोसिएशन यांच्यातील वाद चांगलाच चिघळला आहे.

गंगुबाई जोरगेवार यांनी केवळ स्वतःच्या कुटुंबासाठी नव्हे, तर पदपाथ विक्रेत्यांसाठीही आपले आयुष्य झिजवले. त्यांच्या संघर्षामुळे अनेकांचा रोजगार टिकून राहिला. असंख्य छोट्या विक्रेत्यांसाठी त्या एक प्रेरणास्रोत ठरल्या. यामुळे त्या व्यवसाय करीत असलेल्या जागेला ‘अम्मा चौक’ म्हणून ओळख मिळावी, अशी आग्रही भूमिका असोसिएशनने घेतली आहे.

गांधी चौकाचे नाव बदलण्याचा प्रश्नच येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान, गोंड राजाच्या इतिहासाची पार्श्वभूमी असलेल्या जिल्ह्यात अनेक मोठे राजकीय पुढारी, खेळाडू, समाजकारणी, शिक्षण महर्षी तसेच विविध क्षेत्रांत प्रसिद्धीस आलेले व्यक्तीमत्व होवून गेले.

मात्र, त्यांनी कधीही अशा प्रकारची मागणी किंवा चौकासाठी आग्रह धरला नाही. असाच आग्रह असेल तर छोट्या बाजाराला ‘मामा जिलेबी चौक’, जटपुरा गेटला ‘इटनकर चौक’, गिरनारला ‘बाप्या समोसा चौक’, श्रीकृष्णला ‘संजय लस्सी चौक’, श्री टॉकीजला ‘भाऊ का पोहा चौक’ आणि तुकूम वाहतूक शाखेला ‘चोका बिर्याणी चौक’, तुकूम येथील मातोश्री चौकाला भद्रावती खर्रा चौक, अशी नावे द्यावीत, अशी मागणी समाज माध्यमातून पुढे आली आहे.