नागपूर : सध्या विद्यार्थीदशेत असलेल्या जवळपास प्रत्येक मुलाच्या हातात स्मार्टफोन दिसतो. या स्मार्टफोनमध्ये पाल्य काय बघतो? फेसबुक-इंस्टाग्रामवर कुणाशी मैत्री करतो? याची पालकांना कल्पना नसते. यातूनच अघटित घडते. परंतु, पालकांनी लैंगिकता या विषयासह प्रत्येक विषयांवर मनमोकळेपणाने संवाद साधला तर मुलांच्या कोवळ्या मनातील सुप्त प्रश्नांची उत्तरे सापडू शकतात, असे मत भरोसा सेलच्या समुपदेशक प्रेमलता पाटील, भारतीय स्त्री शक्ती संस्थेच्या समुपदेशिका सुमेधा इंगळे आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वेलफेअर संस्थेच्या समुपदेशिका अनिता गजभिये यांनी व्यक्त केले. ‘लोकसत्ता’ कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान त्या बोलत होत्या. स्मार्टफोनमुळे पालक आणि मुलांमधील संवाद संपत आहे. आईवडीलसुद्धा समाजमाध्यमाच्या जाळ्यात गुरफटले आहेत, असे निरीक्षणही या तज्ज्ञांनी नोंदवले.

घरातून पळून जाणे हा पर्याय नव्हे

अनेक जण कुटुंबीयांचा विरोध पत्करून पळून जाऊन प्रेमविवाह करतात. मात्र, प्रेमविवाहाच्या काही दिवसांतच जबाबदाऱ्यांमुळे दोघांमध्ये वाद सुरू होतात. पळून गेल्यामुळे समाजात बदनामी झाल्याने घरचे रस्तेही बंद होतात. यामध्ये विशेषत: मुली नैराश्यात जातात किंवा आत्महत्येसारखा निर्णय घेतात. काही प्रकरणात बलात्कार, विनयभंग, खंडणीचे गुन्हे दाखल होतात.

हेही वाचा – शेतकरी सन्मान कर्जमुक्तीपासून वंचित शेतकऱ्यांबाबत १५ दिवसांत निर्णय घ्या, नागपूर उच्च न्यायालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

वागणुकीतील बदल लक्षात घ्या

गुगलवर कुणी काय शोधले, याचा डाटा काढून अनेकदा सायबर गुन्हेगार मुलांना नको त्या ॲपकडे घेऊन जातात. नकळत मुले-मुली चोरून अश्लील चित्रफीत बघण्याच्या नादाला लागतात. मुलांच्या वागणुकीत परिणाम होतो. हा बदल लक्षात घ्यायला हवा, असे प्रेमलता पाटील यांनी सांगितले.

मुलांना समाजात मिसळू द्या

पालकांनी लग्न समारंभ, कार्यक्रम, वाढदिवस, सणांच्यानिमित्ताने मुलांना समाजात मिसळू द्यावे. त्यांना आपल्या संस्कृतीची जाणीव करून द्यावी. शेजारी-नातेवाईक यांच्याकडे जावे. मुलांना शारीरिक प्रश्न पडत असतात. या विषयावर कुणीही बोलायला तयार होत नाही. अशा स्थितीत पालकांनी पुढाकार घेऊन त्यांच्या शंकांचे निरसन करावे, असे आवाहन सुमेधा इंगळे यांनी केले.

हेही वाचा – नागपूर : महापालिकेकडूनच अतिक्रमणाचा ‘छुपा’ परवाना? खाद्यापदार्थ विक्रेते जुमानेना

मुलांना भावनिकदृष्ट्या कणखर बनवण्याची जबाबदारी पालकांची आहे. बरेचदा समाजाच्या दबावामुळे मुलांचे काय चुकते आणि काय नाही, हे आपण सहजासहजी स्वीकारत नाही. ते स्वीकारले तर अनेक समस्या सुटू शकतात, याकडे अनिता गजभिये यांनी लक्ष वेधले.