नागपूर : मुंबई, पुण्याच्या तुलनेत आजही विदर्भात चित्रपटांची निर्मिती होतांना दिसत नाही. परंतु काँग्रेसचे दिग्गज नेते व माजी मंत्री सुनील केदार यांची लेक डॉ. पौर्णिमा सुनील केदार यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरण्याचे संकेत दिले आहे. नागपुरातील प्रेस क्लबमध्ये गुरूवारी झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. पौर्णिमा सुनील केदार नेमके काय म्हणाल्या? याबाबत आपण जाणून घेऊ या.
नागपुरात झी इन्सिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह आर्टशी संलग्न असलेली एक शैक्षणिक संस्था डॉ. पौर्णिमा सुनील केदार चालवतात. या संस्थेत ॲनिमेशन, व्ही. एफ. एक्स., डिझाईनशी संबंधित विविध डिग्री व डिप्लोमा अभ्यासक्रम शिकवले जातात. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रासह चित्रपट क्षेत्रातही चांगली संधी आहे. या संस्थेकडून नागपुरातील धरमपेठच्या कुसुमताई वानखेडे सभागृहात २८ ते ३० जून दरम्यान तीन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. त्याबाबत माहिती देण्यासाठी डॉ. केदार यांनी प्रेस क्लबमध्ये पत्रपरिषदत घेतली.
दरम्यान पत्रकारांनी डॉ. केदार यांना आपली संस्था चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरणार काय? अशी विचारना केली. त्यावर डॉ. पौर्णिमा केदार म्हणाल्या, विदर्भात चांगल्या कलावंतांसह चित्रपटाला शोभेल अशा स्थळांची कमतरता नाही. दरम्यान आमच्या शैक्षणिक संस्थेतही मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी ॲनिमेशन, . एफ.एक्स., डिझाईनशी संबंधित अभ्यासक्रमात वाढत आहे. वडिल सुनील केदार यांच्याशी चर्चा करून या विद्यार्थ्यांसह येथील कलावंतांना लाभ होत असल्यास आमची संस्था चित्रपट निर्मिती क्षेत्रात नक्की उतरेल. चित्रपटासाठी लागणारे आवश्यक तांत्रिक प्रशिक्षण आमच्या संस्थेतूनच शिकवले जाते. त्याचाही लाभ आम्हाला होण्याची शक्यता आहे. पत्रकार परिषदेत सौरभ आसोलकर, हर्षल ढोके, वैभव करमरकर, विपीन केदार, मंगेस फलके उपस्थित होते.
‘झिकाॅन’ कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे…
झी इन्स्टिट्यूट ऑफ क्रियेटीव्ह आर्टच्या वतीने नागपुरातील कुसुमताई वानखेडे सभागृहात २८ ते ३० जून २०२५ दरम्यान झिकाॅन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात २८ जुनला खासदार सुप्रीया सुळे, माजी मंत्री सुनील केदार, कलावंत सोनल कौशल उपस्थित राहतील. तर २९ जुनच्या कार्यक्रमाला माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री राजेंद्र मुळक, आमदार अभिजित वंजारी, मराठी कलावंत विवेक सांगळे उपस्थित राहतील. तर ३० जुनच्या कार्यक्रमात ॲनिमेशनशी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल. या तीन दिवसांत कार्यक्रम स्थळी ॲनिमेशनसह या क्षेत्राशी संबंधित विविध स्टाॅलवर सादरीकरणही केले जाणार असल्याचे डॉ. पौर्णिमा केदार यांनी सांगितले.