नागपूर : यशा कामदार सासऱ्यांच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमासाठी सासू आणि मुलाला घेऊन लंडनला निघाल्या होत्या, परंतु नियतीने घात केला. विमान दुर्घटनेत हे तिघेही ठार झाले. यशा कामदार नागपुरातील क्वेटा कॉलनीत राहणारे व्यावसायिक मनीष कामदार यांची मुलगी आहे. बातमी मिळताच कामदार कुटुंबीय तातडीने अहमदाबादकडे निघाले असून त्यांच्या घरी स्मशान शांतता परसली होती.

मागील वर्षी यशा यांच्या सासऱ्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या स्मरणार्थ लंडन येथे २० जूनला एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी सासू आणि मुलगा रुद्र यांच्यासोबत ती लंडनला निघाली होती. अहमदाबाद विमान अपघातात नागपुरातील क्वेटा कॉलनीतील एका कुटुंबातील तीन जण ठार झाले. शहरातील व्यावसायिक मनीष कामदार यांची मुलगी, नातू आणि मुलीची सासू यांचा यात मृत्यू झाला. या भीषण अपघाताची माहिती मिळताच कामदार कुटुंबीय तातडीने अहमदाबाकडे रवाना झाले.

कामदार कुटुंबातील यशा कामदार, रुद्र मोढा आणि रक्षा मोढा यांचा मृतांमध्ये समावेश आहे. यशा कामदार यांचे लग्न अहमदाबाद येथील मोढा कुटुंबात चार वर्षांपूर्वी झाले. हे कुटुंब मूळचे अहमदाबादचे आहे. परंतु, नंतर ते लंडन येथे स्थायिक झाले. काही वर्षानंतर यशा यांचे कुटुंब लंडनहून अहमदाबादला परतले. गेल्यावर्षी यशा यांच्या सासऱ्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या स्मरणार्थ लंडन येथे २० जूनला एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी ती, सासू आणि मुलगा रुद्र यांच्यासोबत लंडनला निघाली होती.

अहमदाबाद ते लंडन या विमानाला गुरूवारी अपघात झाला आणि प्रवाशांसह २६५ जणांचा मृत्यू झाला. अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटात हा अपघात झाला. त्यामुळे हे विमानतळ बंद करण्यात आले आहे. त्याचा फटका नागपूर विमातळारून उडणाऱ्या विमानांना देखील बसला आहे.

अपघातानंतर अहमदाबाद विमानतळावर धुराचे मोठे लोट दिसत आहेत. विमानाने उड्डाण केल्याच्या काही मिनिटांतच ते कोसळले. विमानाने आज दुपारी १.१७ वाजता उड्डाण केले होते. विमानतळाकडे जाणारे अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत.अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथके बचाव कार्यासाठी विमानतळावर दाखल झाली असून, आपत्कालीन सेवा सुरू करण्यात आली आहे. कोसळलेल्या विमानात किमान २४२ प्रवासी होते. त्यापैकी २४१ जण ठार झाले. भारतातील मोठ्या विमान दुर्घटनेपैकी ही घटना आहे. या घटनंतर विमानतळ बंद करण्यात आले आहे.