नागपूर: पूर्व विदर्भातील ट्रान्सपोर्ट चालकांनी कोट्यावधींचे कर्ज घेऊन सिमेंटसह इतर माल वाहतूकीसाठी जड वाहने मोठ्या संख्येने खरेदी केली. परंतु चंद्रपूरातील सिमेंट कंपन्या हळू- हळू परराज्यातील वाहनांना सिमेंट वाहतूकीचे काम देत आहे. त्यामुळे येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांवर उपासमारीची पाळी येऊ शकते. ही कामे येथील ट्रान्सपोर्ट चालकांना न दिल्यास १५ ऑगस्टपासून आंदोलन केले जाईल, असा इशारा नागपूर ट्रकर्स युनिटीकडून दिला गेला.
नागपूर ट्रकर्स युनिटीचे अध्यक्ष कुक्कु मारवाहा, चंद्रपूर सिमेंट युनियनचे अध्यक्ष हरजित सिंग संधु यांच्या नेतृत्वात ट्रान्सपोर्ट चालक- मालकांसह सिमेंटशी संबंधित व्यवसायिकांची बुधवारी अशोका हाॅटेल, जांब, जि. वर्धा येथे बैठक झाली. याप्रसंगी कुक्कु मारवाहा म्हणाले, नागपूर, चंद्रपूरसह पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यातील व्यवसायिक ट्रान्सपोर्ट व्यवसायाशी जुडले आहे. या सगळ्यांनी कोट्यावधींचे कर्ज घेऊन वाहने खरेदी केली. या वाहनांमध्ये मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूरला उत्पादित होणाऱ्या सिमेंटसह इतरही वस्तूंची वाहतूक होते.
हेही वाचा : सावधान! नागपुरातील ‘या’ भागात चिकनगुनिया व डेंग्यूचे इतके रुग्ण…
दरम्यान हल्ली रस्त्यावरील मालवाहतूकीचा खर्च वाढला असून त्याप्रमाने वाहतुकीचे भाडे मिळत नाही. त्यामुळे कशीतरी कर्जाचा हप्ता भरून ट्रान्सपोर्ट व्यवसायीक आपला व्यवसाय चालवत आहे. हल्ली चंद्रपूरच्या सिमेन्ट कंपन्यांकडून ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांवर सिमेंट वाहतुकीचे भाडे कमी करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. दुसरीकडे या कंपन्यांकडून परराज्यातील ट्रान्सपोर्ट व्यवसायीकांना सिमेंट वाहतुकीचे काम दिले जात आहे. हे व्यवसायिक हरीयाणा, राजस्थानसह इतर राज्यातून वाहने आणून येथे कमी दरात मालवाहतूक करत आहे. त्यामुळे येथील व्यवसायिकांवर उपासमारीची पाळी येण्याचा धोका आहे. तातडीने तेथील वाहनांवरील मालवाहतूक बंद करून राज्यातील येथील ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांनाच पूर्वीप्रमाने सिमेंटची मालवाहतूक देण्याची मागणी याप्रसंगी केली गेली. पून्हा परराज्यातील वाहनांवर मालवाहतूक झाल्यास आरटीओ कार्यालयांना तक्रार देऊन या नियमबाह्य मालवाहतूकीबाबत संघटनेकडून तक्रार दिली जाईल. त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई होईल, असेही मारवाहा म्हणाले. सोबत अनेकदा येथील वाहनातून निश्चित ठिकाणी मालवाहतूक झाल्यावरही तेथे वाहन रिकामे करायला काही दिवस लावली जातात. त्यामुळे पुढे २४ तासाहून जास्त काळ वाहन रिकामी करायला लागत असल्यास हाॅल्टिंग शुल्क प्रति दिवस ५ हजार रुपये आकारले जाणार असल्याचेही याप्रसंगी मारवाह यांनी सांगितले. त्यामुळे आता पुढे महाराष्ट्रातीलच वाहनातून मालवाहतूक करण्याची मागणीही बैठकीत केली गेली. बैठकीला नागपूर ट्रकर्स युनिटीकडून हरजितसिंग, अनुज चड्ढा, पंकज जैन, तजिंदर सिंग दारी, लालवानी, राजा तुली, पियुष जैस्वाल, निश्चित बाबरीया, मलकीतसिंग बल, गुरदयालसिंग पड्डा आदी उपस्थित होते.
© The Indian Express (P) Ltd