नागपूर : ‘या भारतात बंधुभाव नित्य वसु दे…’ या विद्यापीठ गीताचे सामूहिक गायन करून ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ करीत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना नागपूर विद्यापीठाने आदरांजली अर्पण केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास विभाग, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने जमनालाल बजाज प्रशासकीय भवनाजवळील मैदानावर विश्वविक्रमी कार्यक्रम शनिवार सकाळी पार पडला. यावेळी विद्यापीठाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसह एकूण चार विश्वविक्रमाची ऐतिहासिक नोंद केली.

कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हास्य अभिनेता भारत गणेशपुरे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री ॲड. आशीष जयस्वाल, आमदार डॉ. आशीष देशमुख, प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे), व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड उपस्थित होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दिलेला करुणा, मानवता, बंधुभाव, एकात्मता, राष्ट्रप्रेम, तरुणांनी ‘उद्योगी तरुण, वीर, शिलवान असावे’ हा संदेश विद्यार्थ्यांसह समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा या उद्देशाने या आगळ्यावेगळ्या आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांची विक्रमी साद

या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या आवाहनाला विक्रमी साद दिली. उपक्रमात अतिशय कमी वेळेत प्राचार्य, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत तब्बल एकूण ५२ हजारांपेक्षा अधिक नोंदणी करून या उपक्रमात सहभाग घेतला. यामध्ये १६ हजार पेक्षा अधिक प्रत्यक्ष उपस्थिती तर १५ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर सहभाग नोंदवत विश्वविक्रमाला गवसणी घातली. एकच गाणे गाणाऱ्या लोकांचा सर्वात मोघेतलानलाइन व्हिडिओ अल्बम या प्रकारात विद्यापीठाने ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ नोंदवला. या प्रकारामध्ये यापूर्वी ५ हजार लोकांच्या एकत्रित गीत गायनाचा असलेला वर्ल्ड रेकॉर्ड विद्यापीठाने आज मोडला. एवढेच नव्हे तर तब्बल १५,४०२ विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधी इमा ब्रेन यांनी यावेळी विद्यापीठाने केलेल्या ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ची घोषणा केली. सामूहिक विद्यापीठ गीत गायन कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यापीठाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसह आणखी ३ विश्व विक्रमाची नोंद केली. विद्यापीठ गीत गाण्यात एकाच वेळी सर्वात मोठा सहभाग या प्रकारात ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ देखील विद्यापीठाने केला. या वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र डॉ. मनोज तत्ववादी यांनी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांच्यासह आयोजन समितीला प्रदान केले.

राष्ट्रसंतांचा मानवता धर्माचे अनुकरण करा – गडकरी

जग संघर्षाच्या उंबरठ्यावर असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दिलेला मानवतेचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश अधिक समर्पक ठरत असल्याचे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केले. विद्यापीठाने स्वीकारलेल्या गीतातून राष्ट्रसंतांनी मानवतेचा सुंदर भाव दिला आहे. मानवतेच्या धर्म पेक्षा कोणताही धर्म, जात, पंथ मोठा नाही. मानवता धर्माचे अनुकरण करू हीच राष्ट्रसंतांना खरी आदरांजली होईल, असे श्री गडकरी म्हणाले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केल्याने विद्यापीठाचे त्यांनी अभिनंदन केले. डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांनी स्वागतपर भाषण करताना देशातील तरुणांमध्ये मानवता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा भाव जागृत करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती दिली.